राज्याच्या विकासाची गती लक्षात घेऊन महापारेषणने २०३० पर्यंतचे नियोजन करावे - चंद्रशेखर बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 19:21 IST2018-08-30T19:21:05+5:302018-08-30T19:21:59+5:30
भविष्यात राज्याचा व प्रामुख्याने मुंबईचा होणारा विकास लक्षात घेऊन महापारेषणने किमान २०३० पर्यंतचे पुढील नियोजन करावे व त्याबाबतचा आराखडा लवकरात-लवकर सादर करावा, असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

राज्याच्या विकासाची गती लक्षात घेऊन महापारेषणने २०३० पर्यंतचे नियोजन करावे - चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई : भविष्यात राज्याचा व प्रामुख्याने मुंबईचा होणारा विकास लक्षात घेऊन महापारेषणने किमान २०३० पर्यंतचे पुढील नियोजन करावे व त्याबाबतचा आराखडा लवकरात-लवकर सादर करावा, असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. महापारेषणच्या राज्य भार प्रेषण केंद्र, कळवा येथे आयोजिलेल्या आढावा बैठकीत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते.
सुरवातीला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य भार प्रेषण केंद्राच्या सर्व्हर रुम व कंट्रोल रुमची पाहणी केली. यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. त्यानंतर मुख्य अभियंता अनिल कोलप यांनी महापारेषणच्या कामकाजाचे सादरीकरण केले. पारेषण केलेली वीज, आकस्मिक घटना, अंदाजपत्रक, वीजनिर्मितीचा आढावा, नियोजित प्रकल्प, महापारेषणची आंतरवाहिनी, मुंबई आयलॅडिंग योजनेचे भारनियमन याबाबत सादरीकरण केले.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ``राज्यास अखंड वीजपुरवठा करण्याच्या दृष्टीने वाढती विजेची मागणी लक्षात घेता महापारेषण अंतर्गत येणाऱ्या राज्य भार प्रेषण केंद्रांचे बळकटीकरण करण्यात येईल, याकरिता आवश्यक निधीची कमतरता पडू देणार नाही. पण, महापारेषणने जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान वापरून राज्याची विजेची गरज पूर्ण करावी.`` सायबर हल्ल्याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच राज्य भार प्रेषण केंद्रांतील त्रुटी दूर करण्याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दिले.
याप्रसंगी महापारेषणचे संचालक (प्रकल्प) रवींद्र चव्हाण, संचालक (संचलन) गणपत मुंडे, संचालक (महिला) श्रीमती पुष्पा चव्हाण, ऊर्जा विभागाचे उपसचिव भीमाशंकर मंता, मुख्य अभियंता श्रीराम भोपळे, शशांक जेवळीकर, श्रीमती ज्योती चिमटे, मोतीसिंह चौहान, सतीश गहेरवार यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.