मिथेनॉलला विष माना

By Admin | Updated: June 20, 2015 00:11 IST2015-06-20T00:11:52+5:302015-06-20T00:11:52+5:30

मुंबईत डझनावारी बळी घेणारी विषारी दारू बनविण्यासाठी मिथेनॉलचा वापर करण्यात आल्याने मिथेनॉलला विषसमान मानले तरच त्याच्या विक्रीवर नियंत्रण आणता येईल,

Considered methanolol toxin | मिथेनॉलला विष माना

मिथेनॉलला विष माना

डिप्पी वांकाणी,  मुंबई
मुंबईत डझनावारी बळी घेणारी विषारी दारू बनविण्यासाठी मिथेनॉलचा वापर करण्यात आल्याने मिथेनॉलला विषसमान मानले तरच त्याच्या विक्रीवर नियंत्रण आणता येईल, असे महसूल अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी मिथेनॉलला विषाच्या वर्गवारीत टाकावे, अशी विनंती महसूल अधिकारी सरकारला करणार आहेत.
महसूल खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार जानेवारी २०१४ पासून मालवणी येथे अशी दारू बनवून विकल्याचे ११७ प्रकार उघडकीस आले आहेत. इथेनॉलची (स्पिरीट) चोरटी, अवैध दारू तयार करण्याचे मुख्य कारण म्हणजे मद्य उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना दर लिटरमागे (करासह) २५० रु. द्यावे लागतात, तर इतर कंपन्या हेच रसायन फक्त ३० पैसे लिटर दराने विकतात. अशा प्रकारे होणाऱ्या विक्रीकडे दुर्लक्ष केल्यास त्याची जबाबदारी महसूल खात्यातील कर्मचाऱ्यांवर टाकण्यात येईल, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्याचे महसूल आयुक्त एस. डी. शिंदे यांनी असे सांगितले की, मिथेनॉलला विषाचा दर्जा देण्यासंदर्भात आम्ही राज्य सरकारकडे अर्ज करू, राज्य सरकार ही मागणी केंद्र सरकारकडे करेल. मिथेनॉलला विषाचा दर्जा असेल तरच अन्नऔषध प्रशासन त्याच्या विक्रीवर नियंत्रण ठेवेल. या रसायनाची वाहतूक रोखली तर विक्रीवर आपोआप नियंत्रण येईल. ते म्हणाले, मुंबईतील विषारी दारू प्रकरणात आजारी असलेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशीही आम्ही बोललो असून या रुग्णांना होणाऱ्या उलट्या, पोटदुखी व नजर जाणे हे विकार मिथेनॉल घेतल्यानंतर होणाऱ्या विकाराप्रमाणेच आहेत. मुंबईत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे या रुग्णांना डायलिसिसची मदत वेळेवर मिळाली नाही, त्यामुळेही मृतांची संख्या वाढली आहे.
महसूल खात्यात ३५ वर्षे काम करणारे निवृत्त अधिकारी एस. जी. पाटील यांच्या म्हणण्यानुसार इथेनॉल (स्पिरीट) वर लावल्या जाणाऱ्या करात मोठी तफावत आहे. मद्य बनविणाऱ्या कंपन्यांना लावला जाणारा कर व इतर कंपन्यांना लावला जाणारा कर वेगळा असल्याने इथेनॉलची काळ्या बाजारात विक्री होते.
महामार्गावरील धाबे व पेट्रोल पंप अशा ठिकाणी बेकायदेशीर दारू तयार करणाऱ्यांना फक्त ५०० रुपयात २०० लिटर इथेनॉल मिळते. त्यात १.२५ लिटर पाणी मिसळले की, उंची मद्यासारखा वास येणारी बेकायदेशीर दारू तयार होते. आपला प्रतिस्पर्धी आपल्यापेक्षा जास्त दारू विकतो असा मत्सर वाटणाऱ्या विक्रेत्याने या दारूत मिथेनॉल मिसळले असावे.

मिथेनॉल म्हणजे काय?
- मिथेनॉल म्हणजेच मिथाइल अल्कोहोल, वूड अल्कोहोल, वूड नाफ्ता वा वूड स्पिरीट हे रसायन असून, त्याचे रासायनिक नाव सीएच३ओएच (एमईओएच). मिथेनॉल हे मद्याचेच एक रूप आहे. ते हलके व रंगहीन, लगेच पेट घेणारे असे द्रव असून, त्याचा वास इथेनॉलशी मिळताजुळता असतो. पण मिथेनॉल तीव्र विषारी असते व ते पिण्यायोग्य नाही.
अशी विषारी दारू विकत असताना पकडण्यात आलेली आरोपी मेनकाबाई ऊर्फ अक्का हिला महसूल अधिकाऱ्यांनी डिसेंबर २०१४ मध्येही पकडले होते. न्यायालयाने तिला २ हजारांच्या जामिनावर सोडून दिले.
हातभट्टीवाल्यांना इथेनॉलऐवजी मिथेनॉलची विक्री वैयक्तिक हेवादाव्यातून झाली असावी. इथेनॉलला मद्याचा वास असतो, तर मिथेनॉलला काहीच वास नसतो, नेहमीच्या सूत्राकडून खरेदी करीत असताना इथेनॉलऐवजी मिथेनॉल दिलेले समजले नसावे, असा संशय महसूल अधिकाऱ्यांना आहे.

वरिष्ठ निरिक्षक, डीसीपी जबाबदार
अवैध गावठी दारूवर मुंबई पोलिसांची कारवाई सुरू असते. मात्र यापुढे अशाप्रकारे गुत्ते सुरू राहिल्यास आणि अन्य यंत्रणांनी त्यावर धाडी घालून कारवाई केल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकासह परिमंडळाच्या डीसीपीला जबाबदार धरून कारवाई करू.
- राकेश मारिया,
मुंबई पोलीस आयुक्त

विषारी दारुत टॉक्सीन
विषारी दारूमध्ये टॉक्सीन असतात. हे टॉक्सीन शरीरासाठी हानिकारक असतात. ४८ तासानंरही काहीवेळा त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. यामुळे अजून रुग्ण दाखल होण्याची शक्यता आहे. विषारी टॉक्सीनमुळे संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. कमी प्रमाणात ज्यांनी सेवन केले असेल त्यांचा जास्त त्रास होणार नाही. ते प्राथमिक उपचार घेऊन बरे होतील. पण, जास्त प्रमाणात घेतलेल्यांना दृष्टी जाणे, किडनी निकामी होणे, फुफ्फुसाचा आजार उद्भवू शकतात. यामुळे त्यांना हिमो डायलेसिस देण्यात येत आहे.
- डॉ. अविनाश सुपे,
अधिष्ठाता,
केईएम रुग्णालय

Web Title: Considered methanolol toxin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.