मातीची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन झाडे लावा
By Admin | Updated: June 5, 2017 02:04 IST2017-06-05T02:04:55+5:302017-06-05T02:04:55+5:30
मुंबईच्या मातीची वैशिष्ट्ये लक्षात घेता मुंबईतील मातीत रुजेल, वाढेल आणि अधिक घट्टपणे मूळ धरेल अशी झाडे लावणे आवश्यक आहे.

मातीची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन झाडे लावा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईच्या मातीची वैशिष्ट्ये लक्षात घेता मुंबईतील मातीत रुजेल, वाढेल आणि अधिक घट्टपणे मूळ धरेल अशी झाडे लावणे आवश्यक आहे. तर मुंबईच्या मातीत घट्टपणे मूळ धरू न शकणारी झाडे वर्दळीच्या ठिकाणी लावणे शक्यतो टाळणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या उद्यान विभागाने कोणती झाडे लावावीत व कोणती लावू नयेत याची यादी यापूर्वीच जाहीर केली असून मुंबईच्या मातीची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन झाडे लावा, असे आवाहन महापालिकेसह पर्यावरणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी संस्थांनी केले आहे.
मुंबई परिसरात झाडे लावताना बहावा, तामण, करंज, नागचाफा, सात्वीन, बकुळ, समुद्रफूल, पुत्रजीवी, कडूनिंब, उंबर, कदंब, पिंपळ, वावळ, शिसव, बेहडा, कांचन, वटवृक्ष यासारखी झाडे प्राधान्याने लावावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचसोबत गुलमोहर, सोनमोहर, पर्जन्यवृक्ष (रेन ट्री), जंगली बदाम यासारखी झाडे वर्दळीच्या ठिकाणी लावणे शक्यतो टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
तामण : ९ ते १८ मीटर उंचीचा हा पानझडी वृक्ष शोभेकरिता देशात सर्वत्र लावलेला दिसतो. रस्त्याच्या दुतर्फा व बागेत हा सामान्यत: आढळतो. पश्चिम द्वीपकल्प, आसाम, ब्रह्मदेश, श्रीलंका, मलाया व चीन येथे नद्यांच्या काठाने अगर दलदली भागातही आढळतो.
करंज : करंजाच्या बियांपासून काढण्यात येणारे तेल हे ‘करंजतेल’ म्हणून ओळखले जाते.
नागकेसर : झाडाचे औषधीय गुणधर्मदेखील असल्याचे मानले जाते.
वावळ : वेगळ्या आकाराची पाने असणारा आणि औषधीय गुणधर्म असणारा हा वृक्ष आहे.
कांचन : हा सुमारे ६ ते ९ मीटर उंच, सरळ, ताठ, सदापर्णी व शिंबावंत (शेंगा येणारा) वृक्ष ब्रह्मदेश, चीन व भारत येथे आढळतो. या झाडाची फुले सुवासिक, मोठी व गुलाबी जांभळी रंगाची असून सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये फांद्यांच्या टोकास येतात. या वृक्षाचे लाकूड साधारण मजबूत व हलके असून साध्या घर बांधणीत व शेतीच्या अवजारांकरिता वापरतात.
उंबर : उंच व सदापर्णी असणारा हा वृक्ष ब्रह्मदेशात, श्रीलंकेत व भारतात सह्याद्री, कोकण, राजस्थान येथे प्रामुख्याने आढळतो.
सातवीण : महाभारत, कौटिलीय अर्थशास्त्र, रघुवंश, किराताजुर्नीय या ग्रंथांत याचा उल्लेख आढळतो. चरक, सुश्रुत व वाग्भट यांच्या वैद्यक ग्रंथांत याचे औषधी गुणवर्णन आढळते.
पिंपळ : हा मोठा पानझडी वृक्ष भारतासह ब्रह्मदेशात व श्रीलंकेतही आढळतो.
शिसव : हिमालयाच्या पायथ्याच्या प्रदेशात, बिहार, ओरिसा आणि मध्य, पश्चिम व दक्षिण भारतात बऱ्याच ठिकाणी हा वृक्ष आढळतो. २५ ते ३० मीटर उंच वाढणाऱ्या या वृक्षापासून मिळणाऱ्या लाकडास शिसवीचे लाकूड असे म्हणतात. दणकट व नक्षीकाम करण्यासाठी उत्तम अशा या काळ्या रंगाच्या शिसवीच्या लाकडाने एकेकाळी महाल आणि वाडे बांधत. विविध वाद्ये बनविण्यासाठीदेखील या लाकडाचा वापर होतो. कॉफीच्या मळ्यात सावलीसाठी प्राधान्याने या झाडाची लागवड करतात.
कदंब : हा एक उपयुक्त व मोठा पानझडी वृक्ष भारतात सर्वत्र (उत्तर कारवारचे घनदाट जंगल, उपहिमालयाचा प्रदेश, आसाम) तसेच श्रीलंका, जावा येथेही आढळतो.
बकुळ : सुगंधी फुलांसह औषधीय गुणधर्म असणारे झाड. फुलांतील सुगंधी द्रव्य अत्तरे, तेल यांमध्ये वापरतात. फुले वाळवल्यावरही त्यांना बराच काळ सुगंध येतो. खोडाच्या सालीत ३-७ टक्के टॅनीन असते; साल कातडी कमाविण्यास व कापडाला पिंगट रंग देण्यास उपयुक्त मानले जाते. हा वृक्ष घराजवळ लावण्यास योग्य मानला जातो.
समुद्रफूल : प्रामुख्याने समुद्रकिनाऱ्याजवळ वाढणारे झाड. मुंबईतील वरळी सी-फेस परिसरात ही झाडे मोठ्या प्रमाणात दिसतात.
पुत्रजीवी : सदापर्णी व लोंबत्या फांद्यांचा हा वृक्ष देशातील उष्ण भागांत व गर्द जंगलांत आढळतो. कोकण व कारवार भागांत तो सामान्यपणे आढळतो. साल गर्द करडी पण कोवळेपणी पांढुरकी असून, झाडास लहान, पिवळट फुले मार्च ते मेमध्ये येतात.
कडुनिंब : गुढीपाडव्याला म्हणजेच मराठी नववर्षाच्या स्वागताला आवर्जून वापरण्यात येणाऱ्या कडुनिंबाचे औषधीय गुणधर्म लहानथोरांपासून अनेकांना माहिती आहेत. कडुनिंबाच्या काडीने दात घासण्याने अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते.