काँग्रेसचे मुस्लीम कार्ड
By Admin | Updated: January 14, 2017 05:00 IST2017-01-14T05:00:14+5:302017-01-14T05:00:14+5:30
शिवसेना, भाजपा आणि काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आशियातील या श्रीमंत महापालिकेवर कब्जा मिळविण्यासाठी प्रत्येक

काँग्रेसचे मुस्लीम कार्ड
गौरीशंकर घाळे / मुंबई
शिवसेना, भाजपा आणि काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आशियातील या श्रीमंत महापालिकेवर कब्जा मिळविण्यासाठी प्रत्येक पक्ष नवमतदारांसोबतच परंपरागत व्होट बँक जपण्याचा आटापिटा करीत आहे. ज्या प्रभागांमध्ये ५० टक्के आणि त्याहून अधिक मुस्लीम लोकवस्ती असेल तिथे मुस्लीम उमेदवार देण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात मुस्लीम समाजात असणाऱ्या नाराजीचा पुरेपूर फायदा उचलण्यासाठी काँग्रेसकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत.
मुंबईतील २२७ प्रभागांपैकी जवळपास ४० ते ५० ठिकाणी मुस्लीम समाजाची वस्ती आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तापरिवर्तनानंतर मुस्लीम समाजामध्ये नाराजीचे वातावरण आहे. गोवंश हत्याबंदी, काही भाजपा नेत्यांची वादग्रस्त विधाने यामुळे मुस्लीम समाजात भाजपाविरोधी वातावरण तयार झाले आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर मुस्लीम वस्त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आणि त्रास दिल्याचा प्रचार सोशल मीडियातून करण्यात आला. एमआयएमचे नेते असुद्दिन ओवेसी यांनी तसा थेट आरोपही केला. या पार्श्वभूमीवर मुस्लीम समाजातील ही भाजपाविरोधी भावना मतपेटीद्वारे काँग्रेसच्या बाजूने व्यक्त व्हावी यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. एकेकाळी मुस्लीम मते काँगे्रसची हक्काची व्होट बँक मानली जात. आता त्यात समाजवादी पार्टी आणि एमआयएम आदी वाटेकरी तयार झाले आहेत. गेल्या काही निवडणुकांमध्ये ही व्होट बँक फुटल्याने काँग्रेसला त्याची किंमत मोजावी लागली होती. पालिका निवडणुकीत मात्र ही व्होट बँक एकसंध राहावी यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. शिवसेना आणि भाजपाला केवळ काँग्रेसच पर्याय आहे. समाजवादी पार्टी आणि एमआयएममुळे मुस्लीम मतांमध्ये पडणारी फूट शिवसेना-भाजपाच्या पथ्थ्यावर पडत आहे. मुस्लीम मतांमध्ये फूट पडावी यासाठीच एमआयएमला जाणीवपूर्वक हवा दिली जात असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. मुस्लीम मतांमध्ये फूट आणि शिवसेना-भाजपाचा फायदा, हे समीकरण मुस्लीम समाजामध्ये ठसविण्यासाठी काँग्रेसकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत.