काँग्रेसचा मेहकरवर दावा
By Admin | Updated: August 22, 2014 23:36 IST2014-08-22T23:36:53+5:302014-08-22T23:36:53+5:30
राष्ट्रवादीचा होणारा सातत्यपूर्ण पराभवामुळे काँग्रेसने मेहकर मतदारसंघावर दावा केला आहे.

काँग्रेसचा मेहकरवर दावा
ब्रम्हानंद जाधव/मेहकर
मेहकर विधानसभा मतदार संघ हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये पूर्वसूत्रानुसार राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेला आहे; परंतु या मतदारसंघात राष्ट्रवादीचा होणारा सातत्यपूर्ण पराभव व मेहकर न.प. आणि लोणार न.प. व पं.स.वर असलेली काँग्रेसची सत्ता लक्षात घेऊन काँग्रेसने या मतदार संघावर दावा केला आहे. जागा वाटपाच्या गणितामध्ये हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांमधून होत असून, येथील काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही आता आमदारकीचे ह्यडोहाळेह्ण लागले आहेत. तर दुसरीकडे वीस वर्षांपासून सत्ता गाजवत असलेला शिवसेना पक्ष यावेळीही जोमात असून, सलग पराभवाची सल बोचणारा राष्ट्रवादी पक्ष मात्र अस्वस्थ आहे.
मेहकर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात असून; प्रतापगड म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे. वीस वर्षांपासून या मतदारसंघात शिवसेनेचाच भगवा फडकत असल्याने प्रत्येक विधानसभेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसची येथे घालमेल होत आहे. शिवसेना विरूद्ध काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशा या लढतीत मनसे व भारिप-बमसं उतरणार असल्याने, चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सन १९९४ पूर्वी मेहकर मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आपसात असलेल्या मतभेदाने १९९४ पासून या मतदार संघाची राजकीय फळीच विस्कटली आहे. २0 वर्षांपासून या मतदारसंघात काँग्रेसची व १५ वर्षांपासून राष्ट्रवादीची विधानसभेची गणितं बदलत गेली आहेत. शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झालेल्या या मतदारसंघात सेनेच्या यशामध्ये खा. प्रतापराव जाधव यांचा सिंहाचा वाटा आहे. या विधानसभेसाठी शिवसेनेकडून आ. डॉ. संजय रायमुलकर यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे दिगंबर डोंगरे व आरपीआय महायुतीचे मधुकरराव गवई यांच्यासह काही कार्यकर्ते मतदार संघातील गावं पिंजून काढत आहेत.