यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बारामती लोकसभा आणि विधानसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाकडेच राहिली आहे. याहीवेळी तेथील पोटनिवडणुकीत शरद पवार यांनी त्यांचा उमेदवार द्यावा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना मांडली.
शरद पवार उमेदवार देणार नसतील तर आम्ही काँग्रेसचा उमेदवार बारामतीमध्ये उभा करू, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, बारामतीत लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत झाली होती. त्यावेळी उद्धवसेनेप्रमाणेच काँग्रेसनेही त्यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात महायुतीसोबत असलेले अजित पवार यांच्याविरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युगेंद्र पवार लढले होते. तेव्हा त्यांनाही पाठिंबा दिलाच होता.
राहुरीची जागाही मविआमध्ये शरद पवारांच्या पक्षाकडे होती. त्यांनी तिथे उमेदवार दिल्यास आम्ही पाठिंबा देऊ. ते उमेदवार देत नसतील तर आमचा उमेदवार असेल, असे सपकाळ म्हणाले.
सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरे यांना फोन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांना फोन करून बारामती पोटनिवडणुकीविषयी चर्चा केल्याची माहिती उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. पक्षप्रमुखांशी त्यांनी पोटनिवडणुकीबाबत चर्चा केली. मात्र त्यासंदर्भातील निर्णय लवकरच स्वतः उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन सांगतील, असे राऊत म्हणाले.
सुनेत्रा पवारांचा पक्ष भाजपबरोबर आहे. काँग्रेस वेगळा निर्णय घेणार असेल तर त्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून लक्ष घातले पाहिजे. पण उद्धव ठाकरे आणि अजित पवारांचे भावनिक नातं होते. त्यामुळे ते जो निर्णय घेतील त्याबाबत ते स्वतः बोलतील, असे राऊत म्हणाले.
ही भावनिक स्थिती, निवड बिनविरोध व्हावी : तटकरे
अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतरच्या अत्यंत भावपूर्ण परिस्थितीत बारामतीकर पोटनिवडणुकीला सामोरे जात आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी ही माझी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवातीपासूनच प्रामाणिक इच्छा आहे. शिवाय हेच महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धरूनही राहील. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सहकार्य करावे, असे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.
मविआतील मतभेद उघड
बारामती पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले आहेत. सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी (शरद पवार) पाठिंबा देईल, असे चित्र असताना काँग्रेसने मात्र ‘एक तर तुम्ही लढा, नाही तर आम्ही लढू,’ असा इशारा त्यांना दिल्याने मविआत एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘बिनविरोध’चा आग्रह कशासाठी?
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार लढत असल्याने ही निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यावर सपकाळ म्हणाले, “महाराष्ट्रात यापूर्वी मोठ्या नेत्याच्या निधनानंतर त्यांचे वारस उभे राहिले तेव्हा निवडणूक झाली होती, मग आताच बिनविरोध का?”
Web Summary : Congress proposes backing Pawar's candidate against Sunetra Pawar in Baramati. If not, Congress will field its own candidate. MVA differences surface over the by-election. Calls for unopposed election raise eyebrows.
Web Summary : कांग्रेस ने बारामती उपचुनाव में सुनेत्रा पवार के खिलाफ पवार के उम्मीदवार का समर्थन करने का प्रस्ताव रखा। अन्यथा, कांग्रेस अपना उम्मीदवार उतारेगी। उपचुनाव को लेकर एमवीए में मतभेद। निर्विरोध चुनाव के आह्वान पर सवाल।