Congress Prithviraj Chavan News: देशाने युद्धकाळातही पारदर्शिकता राखली आहे. १९६५ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, १९७१ मध्ये इंदिरा गांधी आणि कारगिल युद्धाच्या वेळी अटल बिहारी वाजपेयी संसदेस नियमित माहिती देत असत. आज पंतप्रधान ना जनतेसमोर येतात, ना प्रेस कॉन्फरन्स घेतात, ना संसदेचे अधिवेशन बोलवतात. भारत सरकारचे पीओके संदर्भात स्पष्ट धोरण असले पाहिजे, पण ते दिसत नाही, अशी टीका काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
‘वन नेशन-वन इलेक्शन’चा फायदा जरी दाखवला जात असला तरी, पण ब्रिटीश संसदीय पद्धतीत कधीही लोकसभा किंवा विधानसभा भंग होऊ शकते. त्यांनी सांगितले, मी स्वतः १९९६, १९९८ आणि १९९९ मध्ये तीन वर्षांत तीनदा लोकसभा निवडणुका लढल्या आहेत. याचा अर्थ लोकसभा कोणत्याही वेळी भंग होऊ शकते, आणि त्यानंतर उपलब्ध कार्यकाळासाठी वेगळ्या निवडणुका घ्याव्या लागतील, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
अद्यापही EVM हटविण्याची भूमिका घेत नाही
केंद्र सरकार अमेरिका-प्रणालीप्रमाणे निवडणूक प्रक्रिया भारतात आणण्याचा प्रयत्न करीत आहे, ज्याचा काँग्रेस विरोध करते. यासह त्यांनी ईव्हीएम वर पूर्णपणे बंदी आणण्याची मागणी पुन्हा केली. जगभर ईव्हीएम विरोध होत आहे, परंतु केंद्र सरकार अद्यापही EVM हटविण्याची भूमिका घेत नाही, या शब्दांत चव्हाण यांनी निशाणा साधला.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी मनात आणले, तर एका तासात विजय शाह याचे मंत्रीपद काढू शकतात, पण मोदी असे करताना दिसत नाहीत. कारण त्यांना त्यांच्या मंत्र्यामध्ये आदिवासी वोट बँक दिसत आहे. पण विजय शाह यांनी ऑपेरेशन सिंदूर मधील भारतीय सेनेच्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत अत्यंत चुकीची प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावर कोर्टाने ताशेरे ओढले असतानाही या मंत्र्याला पाठीशी घातले जात आहे हे अत्यंत निंदनीय आहे, असा हल्लाबोल चव्हाण यांनी केला.