काँग्रेस-राष्ट्रवादीचे मोठे नेते भाजपाच्या संपर्कात- गिरीश महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 02:25 IST2017-09-03T02:24:51+5:302017-09-03T02:25:10+5:30
काँग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे मोठे नेते भाजपाच्या संपर्कात- गिरीश महाजन
नाशिक : काँग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या वाढदिवसाला प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्याची इच्छा होती. मात्र, कामाच्या व्यस्ततेमुळे दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या, असे त्यांनी सांगितले.
जलसंपदा विभागाच्या एका कार्यक्रमात गिरीश महाजन यांच्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी स्तुतिसुमने उधळली. २५ वर्षे आपण मंत्री होतो, मात्र इतक्या वर्षात जलसंपदासाठी इतका निधी पश्चिम महाराष्टÑासाठी आला नाही, असे त्यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर महाजन म्हणाले की, पतंगराव कदम काय किंवा गणपतराव देशमुख काय, यांनी जे सत्य आहे, तेच सांगितले.
नारायण राणे, पतंगराव कदम, राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपात आल्यास नरेंद्र मोदीच्या काँग्रेसमुक्त भारताला ती मदतच होणार आहे. या नेत्यांचे भाजपात स्वागतच आहे, असे ते म्हणाले.
खडसेंची नाराजी व्यक्तिगत
खडसे हे सरकारवर टीका करीत नाहीत. ती त्यांची व्यक्तिगत टीका असते. काहीवेळा ते शेरो-शायरीतून टीका करतात. नुकतेच खडसे यांनी आपण समुद्रात बुडणार नाही, तर त्यावर स्वार होऊ, असे म्हटले होते. त्यावर मिश्किलपणे आपलाही एक शेर आहे, असे गिरीश महाजन यांनी सांगत ‘मै जब समंदर मै डूबने लगता हूँ, तो दरीया मुझे उछाल देता है’ असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.