वज्रमूठ सभांबाबत काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची अपडेट; म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि NCP नेते...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 17:10 IST2023-05-04T17:09:20+5:302023-05-04T17:10:18+5:30
Maharashtra Politics: राज्यात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे.

वज्रमूठ सभांबाबत काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची अपडेट; म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि NCP नेते...”
Maharashtra Politics: शरद पवार यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर मविआचे भवितव्य काय, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यासह महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या वज्रमूठ सभा एकाएकी रद्द केल्यानंतर मविआची वज्रमूठ सैल झाली का, याबाबतही चर्चांना उधाण आले आहे. मात्र, याबाबत शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांबाबत माहिती देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी नगर, नागपूर व मुंबई अशा तीन वज्रमूठ सभा झालेल्या आहेत. पुणे, नाशिक, कोल्हापूर व अमरावती येथे पुढील सभा होणार आहेत. परंतु मागील काही दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. त्यामुळे सभांचे वेळापत्रक बदलण्याचा विचार झालेला आहे. वज्रमूठ सभा रद्द केलेल्या नाहीत. उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे नेते यांच्याबरोबर या विषयावर चर्चा झालेली आहे, लवकरच या सभांचे फेरनियोजन केले जाईल, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
त्या पार्श्वभूमीवर सभा सुरू ठेवणे योग्य ठरले नसते
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही वज्रमूठ सभा रद्द करण्याबाबत भाष्य केले. वज्रमुठ सभा मे महिना आणि जून महिन्याच्या सुरुवातीपर्यंत घेण्याचे नियोजन होते. त्यासाठी मीच पुढाकार घेतला होता. मात्र या सभा संध्याकाळी जरी घेतल्या जात असल्या तरी दुपासपासून लोक येत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी जे काही घडले. त्या पार्श्वभूमीवर सभा सुरू ठेवणे योग्य ठरले नसते, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"