मुंबई : राज्यातून निवडून देण्याच्या राज्यसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. मात्र या एका जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू असून, त्यावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. गुरुवारी यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) च्या नेत्यांची बैठक पार पडली. मात्र या बैठकीतूनही तोडगा निघालेला नाही.
काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील तर राष्ट्रवादी (शरद पवार) कडून प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली.
या बैठकीत काँग्रेसने ठाम भूमिका मांडत राज्यसभेची जागा यावेळी काँग्रेसला मिळाली पाहिजे, असा आग्रह धरल्याचे सूत्रांनी सांगितले.
२०२२ साली महाविकास आघाडीत चार जागांपैकी दोन जागा राष्ट्रवादी (शरद पवार) ला देण्यात आल्या होत्या. त्यामुळे यावेळी ही जागा काँग्रेसला मिळावी, असा आग्रह काँग्रेसच्या नेत्यांनी या बैठकीत धरल्याचे समजते. मात्र या बैठकीत जागेबाबत तोडगा निघाला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
पवारांसाठी जागा सोडा
शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार असून, त्यांच्यासाठी ही जागा मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी (शरद पवार) च्या नेत्यांनी या बैठकीत केली. त्यावर शरद पवारांनी स्वतः ही इच्छा प्रदर्शित केली आहे का? असे काँग्रेसकडून विचारण्यात आले. मात्र स्वतः शरद पवार याबाबत अधिकृत काही बोलले नाहीत.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी ती इच्छा व्यक्त केल्याचे पक्षातील नेत्यांनी सांगितले. स्वतः शरद पवार यांनी याबाबत भूमिका न मांडल्याने काँग्रेसने या जागेवरील दावा सोडलेला नाही. मात्र शरद पवार जर राज्यसभेवर जाण्यास तयार असतील तर मात्र काँग्रेस हा आग्रह सोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उद्धवसेनाही आग्रही
दरम्यान, महाविकास आघाडीत सर्वात जास्त आमदार उद्धवसेनेचे आहेत. त्यामुळे ही जागा आम्हाला मिळावी, असा आग्रह उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत याबाबत एकमत झालेले नाही. त्यामुळे ही जागा कोणाला सुटणार याकडे लक्ष लागले आहे.
Web Summary : Congress insists on Rajya Sabha seat amid MVA tussle. Meeting with NCP inconclusive. Pawar's potential candidacy adds complexity. Shiv Sena (UBT) also stakes claim.
Web Summary : महाविकास अघाड़ी में राज्यसभा सीट को लेकर खींचतान है। कांग्रेस सीट पर अड़ी है, राकांपा के साथ बैठक बेनतीजा रही। शिवसेना (यूबीटी) ने भी दावा किया।