राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून राज्यातील विरोधी पक्षांमध्ये निर्माण झालेला तिढा अद्याप कायम असून, वाट्याला येणाऱ्या राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस जवळ आला तरी महाविकास आघाडीकडून उमेदवाराचं नाव जाहीर झालेलं नाही. या दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शरद पवार यांच्या नावाला काँग्रेसच्या हायकमांडने हिरवा कंदिल दाखवला असून, शरद पवार यांना पाठिंबा देण्याची सूचना काँग्रेसच्या हायकमांडने राज्यातील नेत्यांना दिली आहे. या संदर्भातील माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने राज्यसभेची जागा आम्हाला मिळावी, असा आग्रह आम्ही धरला होता. राज्यसभेची जागा आम्हाला द्यावी आणि विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला द्यावी, अशी मागणी आम्ही केली होती. ही बाब आम्ही हायकमांडला देखील कळवली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांनी दिल्लीशी संपर्क साधला. उद्धव ठाकरेंशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी भूमिका मांडली. तसेच आमच्या प्रदेशाध्यक्षांशी देखील सुप्रिया सुळे यांनी चर्चा केली.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख आहेत. तसेच आम्ही आघाडीचा धर्म पाळणारे आहोत. तो आघाडी धर्म पाळून महाविकास आघाडी एकत्र राहावी, मजबुतीने पुढे जावी, ही आमची भूमिका राहिलेली आहे. म्हणून आमच्या हायकमांडने कदाचित शरद पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असावा, असं आमचं मत झालेलं आहे. तसेच त्यांनी शरद पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या संदर्भात आम्हाला पक्ष प्रभारींचाही फोन आला होता. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी शरद पवार यांना राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे शरद पवार हे उद्या महाविकास आघाडीचे उमेदवार ठरतील, अशी शक्यता आहे. मात्र तीनही पक्ष एकत्र बसून पुढे जात नाहीत. तोपर्यंत हा अंतिम निर्णय आहे, असे समजण्याचे कारण नाही, असे सांगत वडेट्टीवार यांनी राज्यसभेच्या उमेदवारीबाबत संभ्रम वाढवला आहे.
Web Summary : Congress High Command supports Sharad Pawar for Rajya Sabha. State leaders informed. Allies discuss seat sharing amidst ongoing negotiations. Final decision pending joint meeting.
Web Summary : कांग्रेस आलाकमान ने शरद पवार की राज्यसभा उम्मीदवारी का समर्थन किया। राज्य के नेताओं को सूचित किया। सहयोगी दलों के बीच सीट बंटवारे पर बातचीत जारी है। अंतिम निर्णय संयुक्त बैठक के बाद।