Congress Harshwardhan Sapkal News: राज्यातील पोलीस यंत्रणा असून अडचण नसून खोळंबा अशी आहे. गुन्हेगार मोकाट फिरतात आणि पोलीस मात्र सर्वसामान्य जनतेवर कायद्याची दंडेलशाही दाखवत आहेत. पुण्यातील कोथरूड पोलीसांनी तीन तरुणींच्या घरात घुसून त्यांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेतले, त्यांना जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. ज्या पोलिसांनी हा प्रताप केला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ का केली जात आहे? या पोलिसांवर ऍट्रॉसिटी कलमाखाली तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
एका महिलेला मदत केल्याच्या कारणावरून या तीन सामाजिक कार्यकर्त्या तरुणींच्या घरात घुसून पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समजते. या मुजोर पोलिसांना कोण पाठिशी घालत आहे? पुण्याचे पोलीस आयुक्त काय खुर्चीवर बसून झोपा काढतात काय. कोणाच्या दडपणाखाली पोलीस काम करत आहेत. तीन तरूण मुलींवर पोलीस अत्याचार करतात आणि कारवाई होत नाही. एफआयआर नोंदवण्यास कोणत्या मुहुर्ताची वाट पहात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्याच्या पालकमंत्र्यांनी जातीने या प्रकरणी लक्ष घालून मुजोर पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
दरम्यान, पुण्यात ड्रग्जचा काळाबाजार खुलेआम सुरु आहे, कोयता गँगचा हैदोस सुरू आहे, त्याला आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. पुण्यात दादागिरी वाढली आहे असे खुद्द मुख्यमंत्रीच जाहीरपणे सांगत आहेत पण कारवाई मात्र करत नाहीत, असा हतबल मुख्यमंत्री काय कामाचा. पुणे पोलीसांनी सर्वसामान्य लोकांना कायद्याचा नाहक बडगा दाखवण्याऐवजी पुण्यातील अवैध धंदे व गुन्हेगारी मोडीत काढण्याचे काम करण्याची गरज आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.