Congress Harshwardhan Sapkal News: राज्यात यावर्षी सरसरीपेक्षा दुप्पट, तिप्पट पाऊस पडला आहे. ३६ जिल्हे व ३५८ तालुक्यापैकी ३० जिल्हे व जवळपास ३०० तालुके अतिवृष्टी आणि पूरग्रस्त आहेत. राज्यभरात जवळपास १४३ लाख हेक्टरवरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाऊस सातत्याने पडत असून शेतकरी हवालदिल झाला आहे परंतु राज्यातील महायुती सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही, पालकमंत्र्याने पाहणी सुद्धा केली नाही. मंत्रिमंडळात बैठकीत फक्त कोरडी चर्चा झाली. सरकारने झोपेतून जागे व्हावे व संकटातील शेतकऱ्याला हेक्टरी सरसकट ५० हजार रुपये तातडीने द्यावेत व शेतजमीन खरडून गेली त्यांना हेक्टरी ५ लाख रुपये द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर चौफेर हल्ला केला. ते पुढे म्हणाले की, मुसळधार पावसामुळे मराठवाडा, विदर्भातील काही जिल्हे, सोलापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाड्यात तर अत्यंत वाईट परिस्थिती आहे. काँग्रेस पक्ष मागील दोन महिन्यापासून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करत आहे, पण शेतकरी विरोधी महायुती सरकार मात्र पोकळ आश्वासने देत आहे. पावसाने हाहाकार माजवला आहे, शेतातील पिकं, जमीन, पुशधन, गृहपयोगी साहित्य सर्व वाहून गेले पण राज्यातील आंधळं, बहिरं व मुक्या सरकारला त्यांच्या वेदना दिसत नाही, मंत्र्यांना जिल्ह्यात जाऊन दौरे करा अशा सुचना मुख्यमंत्र्यांना कराव्या लागत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले, असा सवाल सपकाळ यांनी विचारला आहे.
काँग्रेसचे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार
काँग्रेस सरकार असताना पिकाचे लाल्या रोग, बोंड आळीने नुकसान केले, गारपीट चक्रीवादळाने नुकसान केली की तातडीने मदत दिली जात पण भाजपा युतीचे सरकार मात्र नियम, अटी, शर्ती यातच अडकून पडले आहे. एवढे मोठे नुकसान झाले असताना पंचनामे कसले करता, आधी मदत द्या, मग कागदी सोपस्कार पूर्ण करा. सरकारचे मंत्री झोपले असताना काँग्रेसने समिती नेमून पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू केली आहे. नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी करणार आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
दरम्यान, डोंबिवलीतील एका ७२ वर्षांच्या दलित काँग्रेस कार्यकर्त्याला भाजपाच्या गुंडांनी अत्यंत वाईट वागणूक दिली. डॉक्टरकडे गेलेल्या या ज्येष्ठ नागरिकाला बाहेर बोलावून जातीवाचक शिव्या दिल्या. तुमच्या जातीचे लोक माजलेत, असे म्हणत धमक्या दिल्या. या घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करतो. भाजपाच्या या गुंडांवर खून, बलात्कारासारख्या २० पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे. भाजपाने असे विकृत, गुंड, मवाली लोक पाळले आहेत, त्यांचा बंदोबस्त करा अन्यथा काँग्रेस त्यांना धडा शिकवेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.