Congress Harshwardhan Sapkal News: आगामी मुंबईसह राज्यभरातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. राज ठाकरे यांच्याकडून पुन्हा एकदा राजकीय युतीसाठी हात पुढे केलेला हात आणि उद्धव ठाकरे यांचा प्रतिसाद यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
कुठलीही मोठी गोष्ट डोळ्यासमोर ठेवली तर आमच्यातील वाद खूप किरकोळ आहे. त्यासमोर महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तित्वावासाठी आमच्यातील वाद आणि बाकी सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणे आणि एकत्र राहणे, या गोष्टी कठीण नाहीत, पण प्रश्न फक्त इच्छेचा आहे. शिवसेनेत असताना मला उद्धवसोबत काम करायला काही प्रॉब्लेम नव्हता. आमची युती व्हावी, अशी महाराष्ट्राची इच्छा असेल तर महाराष्ट्राने त्यांना (उद्धव ठाकरेंना) जाऊन सांगावं तसं. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये मी माझा इगो कधी मध्ये आणत नाही, आणला पण नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले असून, राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच
पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येण्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भाजपा महाराष्ट्राचे नुकसान करत आहे. उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जात आहेत. भाजपा व महायुती महाराष्ट्राच्या मुळावर उठली आहे. भाजपा महाराष्ट्र धर्माच्या विरोधात आहे. ते महाराष्ट्र धर्माचे नुकसान करत आहेत. शिव, शाहु, फुले आंबेडकर यांच्या विचाराच्या राज्यात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची परंपरा आहे पण भाजपा मात्र महाराष्ट्राची भाषा व संस्कृती तोडण्याचे काम करत आहे. याला राज ठाकरे यांच्या विचारातून दुजोरा मिळत आहे. आम्ही भारत जोडोवाले आहोत, कुटुंब फोडणारे नाही. दोन परिवार एकत्र येत असतील तर आक्षेप घेण्याची गरज नाही, जोडले जात असतील तर स्वागतच आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीसाठी आवाहन केल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. मराठीच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मीही किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. मराठीच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं मीदेखील आवाहन करत आहे. पण आमची फक्त एक अट आहे. महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचे स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलावणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याच्या पंगतीला मी बसणार नाही, हे आधी ठरवा आणि मग महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातील भांडणे, जी कधी नव्हती, तीही आजपासून मिटवून टाकली चला. महाराष्ट्राच्या हितासाठी मग सर्व मराठी माणसांनी ठरवायचे की, भाजपासोबत जायचे की माझ्या शिवसेनेसोबत यायचे. पण आधी ठरवा की, कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचे, मराठी आणि हिंदुत्वाचे हित होणार आहे. हे आधी ठरवा आणि मग जो काही पाठिंबा द्यायचा असेल, विरोध करायचा असेल तो बिनशर्त द्या, माझी काही हरकत नाही. फक्त एकदा सोबत आल्यानंतर समोर जे चोर आहेत त्यांच्या गाठीभेटी घेणार नाही, त्यांचा प्रचार करणार नाही, अशी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्या, अशी अट उद्धव ठाकरे यांनी ठेवली आहे.