कॉँग्रेस-भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू -ओवेसी
By Admin | Updated: April 1, 2015 02:29 IST2015-04-01T02:29:19+5:302015-04-01T02:29:19+5:30
कॉँग्रेसने आतापर्यंत अल्पसंख्याकांना भीती दाखवून मते मिळविली, तर भाजपा दोन समाजांत विद्वेष पसरविणे आणि हिंदू बांधवांच्या भावना

कॉँग्रेस-भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू -ओवेसी
मुंबई : कॉँग्रेसने आतापर्यंत अल्पसंख्याकांना भीती दाखवून मते मिळविली, तर भाजपा दोन समाजांत विद्वेष पसरविणे आणि हिंदू बांधवांच्या भावना भडकविण्याचे राजकारण करीत आहेत. गेल्या १० महिन्यांत पंतप्रधान मोदी यांनी परदेश दौरे काढण्याचा एककलमी कार्यक्रम राबवित ‘अच्छे दिन’च्या आश्वासनाला तिलांजली दिली आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने जनता त्यांच्या आमिषाला बळी पडणार नाही, असे प्रतिपादन ‘एमआयएम’चे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी खेरवाडीत केले.
वांद्रे (पू़) विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार सिराज खान यांच्यासाठी आयोजिलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. खेतवाडीमध्ये कॉँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांचे प्रचार कार्यालय आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण होऊन अनुचित घटना होऊ नये, यासाठी पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला होता.
ओवेसी म्हणाले, की आपण भारतीय राज्यघटना मानत असून त्याने दिलेल्या अधिकारानुसार समाजातील अल्पसंख्याक व बहुजनांच्या हितासाठी संघर्ष करीत आहोत. मात्र जातीयवादी शक्ती व कॉँग्रेसकडून आपल्याबद्दल जाणीवपूर्वक गैरसमज पसरविला जात आहे. केंद्रात व महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर आरएसएस व हिंदुत्ववादी संघटनेच्या नेत्यांनी घटनेविरोधात व भडकाऊ विधाने केलेली आहेत. त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज असताना सरकारकडून त्यांना अभय देऊन समाजात फूट पाडण्याचे काम सुरू आहे. या वेळी उमेदवार सिराज खान यांनी आपण मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. (प्रतिनिधी)