Rajya Sabha Elections 2022: “देशमुख, मलिकांचे मत मिळाले नाही, तरी महाविकास आघाडी विजयी होईल”: बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 16:42 IST2022-06-08T16:41:38+5:302022-06-08T16:42:35+5:30
Rajya Sabha Elections 2022: आमचे गणित आम्ही व्यवस्थित केले आहे आणि आम्ही ते अचूक सोडवणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी नमूद केले.

Rajya Sabha Elections 2022: “देशमुख, मलिकांचे मत मिळाले नाही, तरी महाविकास आघाडी विजयी होईल”: बाळासाहेब थोरात
संगमनेर: राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Elections 2022) रणधुमाळी जोरदार सुरू आहे. महाविकास आघाडीसह भाजप एक-एक मतासाठी मोठी मेहनत घेताना दिसत आहेत. भाजपसह महाविकास आघाडीतील घटक पक्ष आता अपक्षांची मते मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे. महाविकास आघाडीसह भाजपने आपले सर्व उमेदवार निवडून येतील, असा दावा केला आहे. यातच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची मते मिळाली नाहीत, तरी महाविकास आघाडीचाच विजय होईल. आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे, असा दावा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडींवर त्यांनी भाष्य केले. राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ईडी कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी मतदानाची परवानगी मिळावी, याबाबत विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांची मते मिळाली नाहीत, तरी महाविकास आघाडी चारही जागेवर विजयी होऊ शकेल, असे थोरात म्हणाले.
महाविकास आघाडीची चौथी जागा निवडून यायला काहीच अडचण नाही
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, संजय पवार हे शिवसेनेचे जुने कार्यकर्ते आहेत. महाविकास आघाडीची चौथी जागा निवडून यायला काहीच अडचण नाही. ही निवडणूक आमच्यासाठी अवघड नाही. कारण आमच्याकडे अपक्षांसह मित्र पक्षांचे संख्याबळ आहे. तसेच एमआयएम आणि सपाच्या भूमिकेवर बोलताना, जे जे सोबत येतील त्यांना बरोबर घेऊ, आम्हाला अनेकजण मदत करणारे आहेत, असे थोरातांनी स्पष्ट केले.
एकाही मताची चुक नको म्हणून काळजी घेतली जात आहे
महविकास आघाडीच्या आमदारांना हॉटेलात ठेवल्याबाबत बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. एकाही मताची चुक नको म्हणून काळजी घेतली जात आहे. कोणी गैरहजर राहीला तर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. आमचे गणित आम्ही व्यवस्थित केले आहे आणि आम्ही ते यशस्वीपणे सोडवणार असल्याचे थोरात यांनी नमूद केले.