“मिलिंद देवरांचा निर्णय दुर्दैवी, भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभाला अपशकून...”: थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 11:05 AM2024-01-14T11:05:36+5:302024-01-14T11:08:14+5:30
Milind Deora News: राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला भाजपा आणि त्यांचे सहकारी पक्ष घाबरले आहेत, अशी टीका करण्यात आली आहे.
Milind Deora News: गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झाल्याने मिलिंद देवरा यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मिलिंद देवरा यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर आता यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, काँग्रेस नेत्यांनी मिलिंद देवरा यांच्या निर्णयाबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
आजपासून सुरु होणाऱ्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला भाजपा आणि त्यांचे सहकारी पक्ष घाबरले आहेत. त्यामुळेच यात्रेपासून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी ED, CBI, IT यासारख्या केंद्रीय संस्थांची भिती दाखवून आमच्या काही सहकाऱ्यांना आपल्यासोबत घेत आहेत. काँग्रेस फुटणार अशा आवया उठवणारे भाजपा आणि त्यांचे फुटीर सहकारी दोनवेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेऊन भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतायेत पण तो यशस्वी होणार नाही. या यात्रेची समाप्ती मुंबईतच होणार असून यात्रेच्या समाप्ती सोबतच असंवैधानिक भाजप, शिंदे, अजित पवार सरकारचाही शेवटही होणार आहे, या शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हल्लाबोल केला.
अपशकून करण्याच्या अयशस्वी प्रयत्न केला आहे
आमचे सहकारी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. राजीनामा देण्यासाठी त्यांनी आज भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभाचा दिवस निवडून यात्रेला एकप्रकारे अपशकून करण्याच्या अयशस्वी प्रयत्न केला आहे. देशातील सर्वसामान्य, गोरगरीब, शोषीत, पीडित जनतेला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ६ हजार ७०० किलोमीटरची यात्रा काढणा-या राहुलजी गांधी यांच्या मार्गात अडथळे आणण्याचा आपला हा प्रयत्न आपले वडील, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते स्वर्गीय मुरली देवरा यांना ही आवडला नसेल, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या नेत्यांना त्यांच्या या निर्णयामुळे कसलाही धक्का बसल्याचे दिसत नाही. जे अपेक्षित होते तेच घडले अशा प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांकडून येत आहेत. काँग्रेसची विचारधारा किंवा ध्येयधोरणे पटली नाहीत म्हणून मिलिंद देवरा काँग्रेस सोडून जात आहेत असे नाही तर त्यांना स्वतःला खासदारकी मिळवायची आहे म्हणून ते जात असल्याची टीका काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे.