Congress Balasaheb Thorat News: गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. राजकारणात याबाबत अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत बरीच मतमतांतरेही पाहायला मिळत आहेत. मनसेतीलच काही नेते या आघाडीबाबत अधिक उत्सुक नसल्याचे दिसत आहे. तर ठाकरे गटाकडून या युतीबाबत सकारात्मकता असल्याचे म्हटले जात आहे. यातच आता काँग्रेस पक्षातील एका बड्या नेत्याने ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
शरद पवार यांनी राज-उद्धव एकत्र आले तर चांगले आहे, असे म्हटले. यावर, शरद पवार यांच्या तोंडात साखर पडो. त्यांच्या भावना आम्ही समजून घेतल्या. राज ठाकरे यांनी त्यांच्याबरोबर युती करण्याचा प्रयत्न केला होता. पण या भावना आहेत. या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. स्वतः उद्धव ठाकरे या विषयावर सकारात्मक आहेत, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. यानंतर आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.
जनतेच्या हितासाठी राज-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील, तर आनंद आहे
मी याआधी देखील सांगितले की, राजकारणात तत्वाचे असो किंवा विचाराचे असो मतभेद असू शकतात. त्यामुळे कोणी एकत्र येत असेल तर काहीही हरकत नाही. आता राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांचा एकत्र येण्याचा विचार केला, तर त्यांना एक परंपरा आहे. त्यांच्या आजोबांपासूनची ती परंपरा आहे. पुरोगामी विचारांचे महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणून त्यांचे आजोबा परिचित होते. शेवटी जर जनतेच्या हितासाठी राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे एकत्र येत असतील, तर आनंद आहे. पण ते पुरोगामी विचारांना आणि लोकशाहीला जपण्यासाठी एकत्र यावेत, अशी अपेक्षा आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंबाचे सहा दशकांचे प्रेमाचे ऋणानुबंध आहेत. बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे आणि माझ्या आई-वडिलांचे अतिशय प्रेमाचे संबंध. त्यांनी एकमेकांच्या विरोधात अगदी टोकाची राजकीय भूमिका घेतली. परंतु, कौटुंबिक संबंध दोन्ही बाजूंनी जपले गेले. तेच संस्कार माझ्यावर झालेले आहेत. त्यामुळे अर्थातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही माझ्यासाठी भावासमान आहेत. ते दोघेही एकत्र येत असतील, तर महाराष्ट्राच्या हितासाठी दोघेही मनाचा मोठेपणा दाखवत आहे, हे कौतुकास्पद आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.