दुष्काळावरून काँग्रेसचा हल्लाबोल!
By Admin | Updated: December 1, 2014 02:06 IST2014-12-01T02:06:32+5:302014-12-01T02:06:32+5:30
राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे अडचणीत सापडला असताना सरकारला मात्र दुष्काळ दिसत नाही.

दुष्काळावरून काँग्रेसचा हल्लाबोल!
औरंगाबाद : राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे अडचणीत सापडला असताना सरकारला मात्र दुष्काळ दिसत नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नागपुरात ८ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावर पहिल्याच दिवशी लाखो शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी येथे दुष्काळ परिषदेत दिली.
राज्यभरात १ व २ डिसेंबरला तालुका पातळीवर काँगे्रसचे कार्यकर्ते निदर्शने करतील, तर ४ डिसेंबरला जिल्हा पातळीवर रास्ता रोको केला जाईल. यंदा मान्सूनमध्ये अपुरा पाऊस तर नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे पीकच आले नाही. कापसाचेही उत्पादन अत्यल्प आहे. त्यालाही योग्य भाव मिळत नाही. विदर्भ आणि मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र पाण्याचा दुष्काळ जाणवत नसल्याचे औरंगाबादमध्ये म्हणाले. शिवाय सरकार म्हणे उपग्रहाच्या माध्यमातून माहिती घेत आहे. मग प्रशासन कशासाठी आहे, असा प्रश्न ठाकरे यांनी केला. काँग्रेस सरकारने तीन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज दिले होते. शेतकरी होरपळून निघालेला असताना केंद्र सरकारचे पाहणी पथक सुद्धा अद्याप आलेले नाही, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)