राष्ट्रपतींचा अपमान करणा-या शिवसेनेच्या 'त्या' पोस्टरवरून काँग्रेस नाराज
By Admin | Updated: October 22, 2015 13:09 IST2015-10-22T12:23:03+5:302015-10-22T13:09:17+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसमोर नतमस्तक झालेल्या नेत्यांच्या पोस्टरमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचाही समावेश केल्यामुळे काँग्रेस पक्ष नाराज झाला आहे.

राष्ट्रपतींचा अपमान करणा-या शिवसेनेच्या 'त्या' पोस्टरवरून काँग्रेस नाराज
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसमोर नतमस्तक झालेल्या नेत्यांच्या पोस्टरमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचाही समावेश केल्याने काँग्रेस नेत्यांनी नाराज दर्शवली असून ते शिवसेनेविरोधात पोलिस स्थानकात तक्रार दाखल करणार आहेत. या फोटोद्वारे शिवसेनेने 'देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीचा व त्या पदाचा अपमान केला आहे, असा आरोप काँग्रेसने केला असून आ. भाई जगताप, प्रवक्ते राजू वाघमारे यांच्या काँग्रेस शिष्टमंडळ शिवाजी पार्क पोलिस स्थानकात शिवसेनेविरुद्ध तक्रार नोंदवणार आहे.
शिवसेनेतर्फे काल शिवसेना भवनच्या परिसरात लावलेल्या पोस्टवरून चांगलाच वादंग निर्माण झाला होता. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, राज ठआकरे, नारायण राणे आदींचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर आदराने झुकलेले फोटो पोस्टरवर छापून शिवसेनेने भाजपाला टोला हाणला होता. जे भाजपा नेते एकेकाशी बाळासाहेबांसमोर नतमस्तक होत असत, तेच नेते आता मागील दिवस विसरले असल्याची टीका सेनेने पोस्टरद्वारे केली होती. शिवसेना आणि बाळासाहेबांमुळेच महाराष्ट्रात भाजपाचे अस्तित्व आहे. महाराष्ट्रात भाजपाची सत्ता असली तरी राज्यात आपणच मोठा भाऊ आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्नही शिवसेनेने केला होता. मात्र भाजपा नेते नाराज झाल्याने सेनेची ही खेळी त्यांच्याच अंगाशी आली आणि त्यांना ते पोस्टर हटवावे लागले. हा वाद शमतो न शमतो तोच आता काँग्रेसने शिवसेनेविरोधात तक्रार दाखल केल्याने पुन्हा नवा वाद उफाळण्याची चिन्हे आहेत.