अहमदनगर: शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष माजी आमदार जयंत मुरलीधर ससाणे यांचे सोमवारी पहाटे श्रीरामपूर येथे दुःखद निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ४ वाजता श्रीरामपूर येथील अमर धाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.श्री साईबाबा संस्थानाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक लोकाभिमुख कामे केली. साई आश्रम भक्त निवास, प्रसादालाय, शहरातील रस्त्यांचे भूसंपादन, विमानतळ उभारणीसाठी निधी ही त्यांची कामे कायम लक्षात राहणारी आहेत. याशिवाय, त्यांनी 10 वर्षे श्रीरामपूरचे आमदारपद आणि 15 वर्षे नगराध्यक्षपद भुषविले. श्रीरामपूर नगरपालिकेला त्यांनी जिल्ह्यात सर्व योजना राबवणारी व सक्षम नगरपालिका अशी ओळख मिळवून दिली होती. श्रीरामपूरची पाणी योजना, रस्ते, दुभाजकाचे सुशोभीकरण, झोपडपट्टी मुक्ती आदी कामाचे श्रेय ससाणे यांना जाते. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील काही दिवसांपूर्वीच ससाणे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी श्रीरामपूर येथे आले होते.
शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष जयंत ससाणे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 08:12 IST