महिला पोलिसांची चिंता मिटली
By Admin | Updated: July 4, 2014 01:11 IST2014-07-04T01:11:00+5:302014-07-04T01:11:00+5:30
पोलीस विभागातील अनेक महिला कर्मचाऱ्यांना आपल्या छोट्या बाळाला घरी सोडून कर्तव्यावर जावे लागत होते. पण आता पोलीस मुख्यालयातील पाळणाघराने त्यांची ती चिंता दूर केली असल्याचे प्रतिपादन

महिला पोलिसांची चिंता मिटली
आर. आर. पाटील यांचे प्रतिपादन : पाळणाघराचे उद्घाटन
नागपूर : पोलीस विभागातील अनेक महिला कर्मचाऱ्यांना आपल्या छोट्या बाळाला घरी सोडून कर्तव्यावर जावे लागत होते. पण आता पोलीस मुख्यालयातील पाळणाघराने त्यांची ती चिंता दूर केली असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केले.
पोलीस मुख्यालयातील पाळणाघराचे गुरुवारी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला शहर पोलीस आयुक्त के. के. पाठक यांच्यासह सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना, अपर पोलीस आयुक्त दीपक पांड्ये, उपायुक्त सुनील कोल्हे व माजी मंत्री रमेश बंग उपस्थित होेते. पाटील पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील पोलीस खात्यात इतर राज्यांपेक्षा सर्वाधिक महिलांची संख्या आहे. येथे अधिकाऱ्यांसह २१ हजार महिला पोलीस कर्मचारी आहेत; शिवाय शहर पोलिसांमध्ये ९८५ महिला आहेत.
विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी पोलीस खात्यात महिला कर्मचाऱ्यांची कल्पनासुद्धा केली जात नव्हती. पण अलीकडे मोठ्या प्रमाणात महिलांची भरती झाली आहे. मात्र या महिलांना अनेकदा आपले छोटे मूल घरी सोडून कर्तव्य बजावण्यासाठी बाहेर पडावे लागते. अशाच काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने आपली भेट घेऊन त्यांच्या काही समस्या मांडल्या होत्या. त्यापैकी पाळणाघर एक समस्या होती. यानंतर लगेच पाळणाघराची योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. आता नागपूर पोलिसांचे राज्यभरात अनुकरण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त के. के. पाठक म्हणाले, पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार पाळणाघर सुरू करण्यात आले.
सध्या येथे २५ ते ३० मुले ठेवण्याची सुविधा तयार करण्यात आली आहे; परंतु लवकरच ती क्षमता १०० पर्यंत वाढविण्यात येईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)