हिंदीची सक्ती म्हणजे  मराठी भाषेवरचे अतिक्रमण; साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:38 IST2025-06-03T12:37:59+5:302025-06-03T12:38:18+5:30

"भाषेला विरोध नाही तर तिची सक्ती करण्यास विरोध आहे."

Compulsion of Hindi means encroachment on Marathi language; Opinion of Sahitya Mahamandal President Milind Joshi | हिंदीची सक्ती म्हणजे  मराठी भाषेवरचे अतिक्रमण; साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांचे मत

हिंदीची सक्ती म्हणजे  मराठी भाषेवरचे अतिक्रमण; साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मराठीची अवस्था बिकट असताना, हिंदीची सक्ती करणे योग्य नाही. सक्तीमुळे मराठी भाषेवर आक्रमण होईल. म्हणून महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे, असे मत  अ. भा. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी रविवारी व्यक्त केले.

भाषेला विरोध नाही तर तिची सक्ती करण्यास विरोध आहे. इंग्रजी सक्ती केली, तेव्हा साहित्यिकांनी भूमिका घेतली होती, असे ते म्हणाले. ग्रंथ संग्रहालयाच्या १३२ व्या वार्षिकोत्सवानिमित्त ललित गटातून रामदास खरे यांच्या ‘द लॉस्ट बॅलन्स’, तर ललितेतर गटातून सदाशिव टेटवीलकर यांच्या सह्याद्री परिक्रमा या पुस्तकांना ॲड. वा. अ. रेगे जिल्हास्तरीय पुरस्काराने, तर श्यामला ठाणेकर यांना उत्कृष्ट सेविका पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

पुनर्लेखनाची गरज 

हल्ली सुचले की लिहून टाकतात, पण साहित्यनिर्मिती ही दुधाची दही होण्याइतकी सोपी गोष्ट नाही. प्रतिभा आणि शब्द सामर्थ्य असले म्हणून लिहिता येतेच असे नाही. त्या जोडीला अनुभवही असावा लागतो. आपले सोडून इतरांचे न वाचणे ही मराठी साहित्यिकांसाठी चांगली गोष्ट नाही. नव्या लेखकांनी वाचनाबरोबर पुनर्लेखन करण्याचीही गरज आहे, असे ते म्हणाले. 

लाइक आणि कमेंट म्हणजे अभिप्राय नव्हे...

समाजमाध्यमांमुळे साहित्याचे लोकशाहीकरण झाले. लेखक होण्याची संधी मिळाली; पण संपादन ही गोष्ट हद्दपार झाली. लाइक आणि कमेंट म्हणजे अभिप्राय नाही. हल्ली स्वत:च स्वत:चे पुस्तक प्रकाशित करण्याची पद्धत सुरू झाली आहे. त्यामुळे प्रकाशित साहित्याला वेगळा आकार देणाऱ्या मधल्या प्रक्रियाच गळून पडतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

Web Title: Compulsion of Hindi means encroachment on Marathi language; Opinion of Sahitya Mahamandal President Milind Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.