महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद, सोलापूरला दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 06:27 IST2020-01-25T06:27:12+5:302020-01-25T06:27:28+5:30
केंद्र सरकारचा नवा नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद, सोलापूरला दगडफेक
मुंबई : केंद्र सरकारचा नवा नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबईसह उर्वरीत महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद होता.
मुंबईत बंदला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. चेंबूर, घाटकोपर परिसरात वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत रस्ता मोकळा केला.
ठाणे, भिवंडीत रास्ता रोको करण्यात आला. कार्यकर्त्यांनी सामंजस्य दाखविल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. ठाणे व रायगड जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. पालघरमध्ये ‘बंद’ दरम्यान काही तणावाचीही स्थिती निर्माण झाली होती. पालघरमध्ये बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी बंद विरोधात बाईक रॅली काढली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
पुण्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पुण्यात दांडेकर पूल भागात सुजात आंबेडकर हे स्वत: रस्त्यावर उतरले होते. येथे त्यांनी काही काळ रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.
पश्चिम वºहाडात कडकडीत बंद
पश्चिम वºहाडात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांत बंद दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. दुपारी ४ नंतर व्यापारी प्रतिष्ठाने सुरू झाली. नागपूर व विदर्भातील इतर जिल्ह्यांत संमिश्र प्रतिसाद होता.
मराठवाड्यात दगडफेक
मराठवाड्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. औरंगाबादेत शहर वाहतूक बसवर व नांदेडला एका दुकानावर दगडफेक करण्यात आली. औरंगाबादेत काही भागांत सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. जालना जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद होता. हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, बीड व लातूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला़
सोलापूर बंदला हिंसक वळण
बंदला सोलापुरात हिंसक वळण लागले़ शहरात दोन ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी बसवर दगडफेक करून काचा फोडल्या़ शुक्रवारी सकाळपासूनच शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद होत्या. वंचित बहुजन युवक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढली.
कोल्हापुरात धडक मोर्चा
कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. सातारा, सांगली जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. रिक्षा वाहतूक, दुकाने बंद असल्याने साताºयातील बाजारपेठेत शुक्रवारी शुकशुकाट होता.
नाशिकला जेलरोड, रेल्वेस्थानक परिसरात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. जळगाव, धुळे, नंदुरबारला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
अमरावतीत पाच जखमी
नागपूरसह विदर्भात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अमरावतीत एका व्यापारी प्रतिष्ठानावर दगड भिरकावल्याने पोलिसांना आंदोलकांवर लाठीमार करावा लागला. पाच आंदोलक जखमी झाले. पोलिसांनी १५ आंदोलकांना ताब्यात घेतले. चंद्रपुरात दुकाने बंद होती. वर्धेत उत्स्फूर्त सहभाग होता. यवतमाळात बाईक रॅली काढण्यात आली.
भाजपच्या विरोधानंतरही बंद यशस्वी झाला, प्रकाश आंबेडकर यांचा दावा
मुंबई : शुक्रवारचा महाराष्ट्र बंद यशस्वी ठरल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. वंचितच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर शांततेत बंद पाळला. भाजप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी बंदला विरोध केल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, बंदच्या माध्यमातून नागरिकत्व सुधारणा कायदा तसेच ढासळत्या अर्थव्यवस्थेबाबत लोकांपर्यंत आमचा संदेश पोहोचवायचा होता. त्यात आम्ही यशस्वी ठरलो. त्यामुळे सायंकाळी चार वाजल्यापासून बंद मागे घेत असल्याची घोषणा त्यांनी केली. पोलिसांनी सुमारे साडेतीन हजार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. गुरुवारी रात्रीपासूनच पोलिसांनी ही कारवाई केली. आमच्या कार्यकर्त्यांनी कोठेही हिंसा केली नाही, दगडफेक केली नाही. त्यामुळे या कार्यकर्त्यांना सोडून देण्याची मागणी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचे ते म्हणाले.