गर्भपात प्रतिबंधक कायद्यातील बदलाविषयी संमिश्र प्रतिक्रिया
By Admin | Updated: November 4, 2014 03:05 IST2014-11-04T03:05:01+5:302014-11-04T03:05:01+5:30
अर्भकामध्ये असलेले व्यंग २० ते २४ आठवड्यांत केलेल्या तपासण्यांमध्ये ठळकपणे आढळून येत असल्यामुळे गर्भपात प्रतिबंधक कायद्यात होणाऱ्या बदलाचे एकीकडे डॉक्टरांनी स्वागत केले

गर्भपात प्रतिबंधक कायद्यातील बदलाविषयी संमिश्र प्रतिक्रिया
मुंबई : अर्भकामध्ये असलेले व्यंग २० ते २४ आठवड्यांत केलेल्या तपासण्यांमध्ये ठळकपणे आढळून येत असल्यामुळे गर्भपात प्रतिबंधक कायद्यात होणाऱ्या बदलाचे एकीकडे डॉक्टरांनी स्वागत केले आहे; तर या मसुद्याला कडाडून विरोधदेखील होत आहे़
कायद्यात बदल झाल्यास याला थेट न्यायालयात आव्हान दिले जाईल, असे सामाजिक कार्यकर्त्या अॅड़ वर्षा देशपांडे यांनी सांगितले आहे़ त्या म्हणाल्या, महिलांसाठी गर्भपात हा हक्क असावा़ कारण २४ आठवड्यांपर्यंत गर्भपाताला मुदत देणे हे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक आहे. गर्भपात करताना महिलांच्या आरोग्याचा विचार सर्वप्रथम व्हायला हवा. १२ आठवड्यांपर्यंत जरी एखाद्या महिलेने गर्भपात केला, तरी तिचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. मग, अशावेळी २४ आठवड्यांपर्यंत गर्भपातासाठी मुदत दिल्यास त्या महिलेच्या आणि अर्भकाच्या अशा दोघांच्याही जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा मसुदा केवळ एकतर्फी घेण्यात आला असून, यातून वैद्यकीय क्षेत्राला चुकीचे वळण लागण्याची शक्यता आहे, असे अॅड़ देशपांडे यांनी सांगितले़ तर या मसुद्याचे समर्थन करताना मुंबई आॅबस्ट्रेक्टस् अॅण्ड गायनॉकोलॉजी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अमित पत्की म्हणाले, महिलांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. पण औषध आणि नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते़ तसेच याची दुसरी बाजू अशी आहे, काही अर्भकांना असणारे व्यंग हे त्यांच्या जिवाला धोकादायक असते.
१३ ते २० आठवड्यांमध्ये गर्भपात करायचा असल्यास त्याला सेकंड टर्मिनेशन असे म्हटले जाते. २० आठवड्यांनंतर गर्भपात करण्यास परवानगी नसतानाही काही महिलांच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास आई आणि बाळाचा जीव वाचवण्याच्या दृष्टीने गर्भपाताचा निर्णय घेतला जातो. आता कायदेशीररीत्या २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात करणे शक्य झाल्यास याचा नक्कीच फायदा होईल. जेव्हा गर्भाची २ डी तपासणी करण्यात येते, तेव्हा अर्भकाचा आकार लहान असल्यास नीट दिसत नाही. अर्भकाची वाढ झाल्यास व्यंगाचे स्वरूप स्पष्ट दिसून येते, असे सायन रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे डॉ. गणेश शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)