एकनाथ शिंदे यांच्या बंडाची शिवरायांच्या आग्य्रातून सुटकेशी तुलना, मंगलप्रभात लोढांच्या विधानाने वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 14:54 IST2022-11-30T14:54:08+5:302022-11-30T14:54:36+5:30
Mangalprabhat Lodha: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या एका विधानामुळे राज्यात वाद पेटलेला असतानात आज शिवप्रतापदिन सोहळ्यात राज्य सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडाची शिवरायांच्या आग्य्रातून सुटकेशी तुलना, मंगलप्रभात लोढांच्या विधानाने वाद
मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या एका विधानामुळे राज्यात वाद पेटलेला असतानात आज शिवप्रतापदिन सोहळ्यात राज्य सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. लोढा यांनी एकनाथ शिंदे यांनी शिवेसेनेमध्ये केलेल्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्य्रामधून औरंगजेबाच्या तावडीतून करवून घेतलेल्या बंडाशी केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
आज सातारा जिल्ह्यातील प्रतापगड येथे शिवप्रताप दिन सोहळ्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी उपस्थितांना संबोधिक करताना मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाची तुलना शिवरायांना आग्य्रातून करून घेतलेल्या सुटकेशी केली. यावेळी लोढा म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्य्रातील किल्ल्यात ठेवले होते. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी आग्य्रातून नाट्यमयरीत्या सुटका करून घेतली होती. ते तिथून सुटून बाहेर आले त्यामुळेच ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. त्याचप्रकारे एकनाथ शिंदे यांना रोखण्याचे खूप प्रयत्न झाले. मात्र एकनाथ शिंदे बाहेर पडले, असे विधान मंगलप्रभात लोढा यांनी केले होते.
दरम्यान, लोढा यांच्या या विधानावरून राज्यातील राजकारणा तापले आहे. तसेच विरोधी पक्षांकडून माफी मागण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे लोढा यांनी म्हटले आहे. तर या विधानाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी थेट बोलणे टाळले. तसेच शिवरायांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही, असे सांगितले.