शालेय विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी समिती
By Admin | Updated: July 22, 2015 01:02 IST2015-07-22T01:02:19+5:302015-07-22T01:02:19+5:30
मुंबई-पुण्यातील बालकांमध्ये श्वसनविकाराचे प्रमाण वाढले असून, शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसंदर्भात आणि आरोग्याच्या

शालेय विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी समिती
मुंबई : मुंबई-पुण्यातील बालकांमध्ये श्वसनविकाराचे प्रमाण वाढले असून, शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसंदर्भात आणि आरोग्याच्या तक्रारीच्या निवारणार्थ पर्यावरण आणि आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती नेमणार असल्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी परिषदेत सांगितले.
प्रदूषित हवेमुळे मुंबईतील आणि राज्यातील मुलांचे आरोग्य बिघडत असल्याबाबत काँग्रेस सदस्य अनंत गाडगीळ यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत २०१४-१५मध्ये राज्यातील आरोग्य पाहणीत ५ ते ११ वयोगटातील १ कोटी २२ लक्ष ३६ हजार १२८ विद्यार्थ्यांची तपासणी केली होती. त्या तपासणीत १ लक्ष १५ हजार ५३ विद्यार्थी श्वसन संस्थेच्या विकाराने आजारी असल्याचे आढळून आले आहे. यापैकी १ लक्ष १४ हजार ७१३ विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले. तर ३४० जणांना उपचारासाठी वरिष्ठ रुग्णालयात पाठवल्याची माहिती दीपक सावंत यांनी दिली.
१३ टक्के फुप्फुसाचा विकार
ब्रेथ ब्ल्यु सर्व्हेनुसार मुंबईतील १३ टक्के विद्यार्थ्यांच्या फुप्फुसाची कार्यक्षमता कमी असून, १४ टक्के विद्यार्थ्यांच्या फुप्फुसाची कार्यक्षमता अत्यंत कमी असल्याचे आढळून आल्याचे सावंत म्हणाले.
मुंबईतील माझगाव येथील कोळसा डेपोमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे विकार उद्भवले आहेत. त्यामुळे कोळसा डेपो अन्यत्र हलवावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या राहुल नार्वेकर यांनी केली. त्यावर बदलती जीवनशैली, वाढती बांधकामे आणि प्रदूषण यामुळे श्वसनाचे विकार वाढल्याचे मान्य करत शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसंदर्भात समिती नेमण्याची घोषणा केली.
औषध खरेदीची चौकशी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेला गरज नसताना केलेल्या साडे चार कोटी रुपयांच्या सोडियम हायपोक्लोरोईड खरेदीची आरोग्य विभागाकडून उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी घोषणा आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी विधान परिषदेत केली.सावंत म्हणाले, राज्यातील ९५ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रुग्णालयांकडून झालेली मागणी विचारात घेऊन वर्षभराच्या सोडियम हायपोक्लोरोईडची खरेदी करण्यात आली होती. त्याची एकत्रित किंमत ४ कोटी ४२ लक्ष ९७ हजार इतकी आहे.
आवश्यक औषधांसाठी नाशिक महापालिकेने आरोग्य सेवा संचालनालयास तब्बल २७ स्मरणपत्रे पाठवली. मात्र ती औषधे न देता केवळ सोडियम हायपोक्लोराईड ट्रक भरून पाठवले. स्वच्छतेसाठी सोडियम हायपोक्लोरोईड खरेदी करण्यामागे अधिकाऱ्याचे हात ओले झाल्याचा आरोप जयवंत जाधवांनी केला. त्यावर चौकशी करण्याचे आश्वासन दिले.