फेरीवाल्यांवर कारवाईसाठी अखेर आयुक्त व उपायुक्तच उतरले रस्त्यावर; लोकमतच्या बातम्यांचा प्रभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 09:06 PM2021-11-11T21:06:27+5:302021-11-11T21:08:01+5:30

बेकायदा पार्किंग आणि दुकानदारांनी देखील पदपथ - रस्त्यांवर केलेले अतिक्रमण जाचक ठरले आहे .

the commissioner and deputy commissioner took to the streets to take action against the peddlers | फेरीवाल्यांवर कारवाईसाठी अखेर आयुक्त व उपायुक्तच उतरले रस्त्यावर; लोकमतच्या बातम्यांचा प्रभाव

फेरीवाल्यांवर कारवाईसाठी अखेर आयुक्त व उपायुक्तच उतरले रस्त्यावर; लोकमतच्या बातम्यांचा प्रभाव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या फेरीवाल्यांच्या उच्छादा मुळे शहरात रहदारी व वाहतुकीला होत असलेला प्रचंड अडथळा;  यातील गैरप्रकार व फेरीवाला पथक , प्रभाग अधिकारी यांच्या वरदहस्ता बाबत लोकमतने सातत्याने दिलेल्या बातम्यांनी अखेर स्वतः पालिका आयुक्त दिलीप ढोले व उपायुक्त मारुती गायकवाड यांनीच रस्त्यावरून उतरून फेरीवाल्यांवर कारवाई केली . रस्त्यांवर मोठ्या संख्येने हातगाड्या , फेरीवाले , दुकानदारांचे अतिक्रमण, बेकायदा पार्किंग पाहून आयुक्त संतापले . खालचे अधिकारी काय दिवे लावतात याची प्रचिती त्यांना आली . फेरीवाल्यांना वीज देणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले .

मीरा भाईंदर मध्ये फेरीवाल्याना आणून बसवण्या पासून त्यांना हातगाड्या भाड्याने देणे , वीज पुरवणे , संरक्षण देणे असे विविध प्रकारचे एकप्रकारे माफियाराजच तयार झाले आहे . त्यातच बाजार वसुली करणाऱ्या ठेकेदारांची यातून बक्कळ वसुली होत असते . यात काही नगरसेवकां पासून काही पालिका कर्मचारी , फेरीवाला पथक प्रमुख व प्रभाग अधिकारी आदींचे संरक्षण असल्याने ठोस व सातत्याने कारवाईच पालिका करत नव्हती . यातून शहरात लोकांना पदपथावर व रस्त्यावर चालण्यास जागा उरली नसून वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे . त्यात बेकायदा पार्किंग आणि दुकानदारांनी देखील पदपथ - रस्त्यांवर केलेले अतिक्रमण जाचक ठरले आहे .

महासभेत नगरसेवकांनी फेरीवाल्यांच्या मुद्या वरून प्रशासनाला लक्ष्य केले असता आयुक्तांनी देखील , फेरीवाल्यांवर कारवाई वेळी काही नगरसेवक कॉल करतात ते करू नये असे खडेबोल सुनावले होते . परंतु त्या नंतर देखील कारवाई मात्र होत नव्हती . एखादी दिखाव्या पुरती केली जायची .

उपायुक्त मारुती गायकवाड यांनी विविध प्रभागातील अनधिकृत फेरीवाल्यांचा आढावा घेत अनधिकृत फेरीवाले, विना परवाना टपऱ्या, अनधिकृतपणे दुकानाबाहेर तयार केलेले पत्रा शेड कारवाईचे आदेश दिले होते. फेरीवाला पथक प्रमुख यांनी दुर्लक्ष केल्यास त्यांना जबाबदार धरुन कारवाईचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रभाग अधिकाऱ्यांना दिले होते .

परंतु एकूणच फेरीवाले आदींवर कारवाई केली जात नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आल्याने बुधवारी सायंकाळ पासून ते रात्री पर्यंत स्वतः आयुक्त आणि उपायुक्तांनी कारवाई सुरवात केली . आयुक्तांनी भाईंदर पश्चिमेच्या प्रभाग समिती २ मधील डॉ . बाबासाहेब आंबेडकर ६० फुटी मार्गावर मोठी कारवाई केली . सिमेंटच्या बनवलेल्या या मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांनी कब्जा केल्याने येथे सायंकाळी एकमार्गी वाहतूक करावी लागते. ह्या मार्गावर फेरीवाल्यांच्या अतिक्रमण मुळे चालायला जागा नसते . ज्याचा ताण मुख्य छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर येतो आणि तिकडे प्रचंड वाहनकोंडी होते .

मीरारोड रेल्वे स्थानका बाहेर पडलेल्या फेरीवाल्यांच्या विळख्यावर सुद्धा धडक कारवाई करण्यात आली. दोन्ही ठिकाणी केलेल्या कारवाईत फेरीवाल्यांचा तसेच दुकानदारांचा माल जप्त करण्यात आला . पत्राशेड , बाम्बुशेड तोडण्यात आले. हातगाड्या, परवाना नसलेले स्टॉल्स, फुटपाथवर अनधिकृतरित्या विक्री करणारे विक्रेता तसेच प्लास्टिक पिशव्या ठेवणाऱ्या फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई केली .

नो पार्किंग क्षेत्रामध्ये वाहने लावून जाणाऱ्यांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांची हवा काढून टाकण्यात आली . जे दुकानदार स्वतःच्या दुकानातून रस्त्यावरील फेरीवाल्यांना अनधिकृतपणे वीजपुरवठा करत होते त्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आयुक्त व उपायुक्त यांनी दिले.  गुरुवारी देखील मीरारोड , भाईंदर पूर्व व भाईंदर पश्चिम मधील अनेक ठिकाणी महापालिकेने फेरीवाले , रस्ते - पदपथ वरील दुकानदारांचे अतिक्रमण आदींवर मोठ्या बंदोबस्तात धडक कारवाई सायंकाळ पासून सुरु केली होती . रात्री पर्यंत कारवाई सुरु होती .   
 

Web Title: the commissioner and deputy commissioner took to the streets to take action against the peddlers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.