थंडीचा कडाका कायम
By Admin | Updated: January 14, 2017 04:57 IST2017-01-14T04:56:48+5:302017-01-14T04:57:03+5:30
राज्याला भरलेली हुडहुडी कायम असून परभणी जिल्ह्यात गारठ्याने दोघा ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. सातपुड्यातील

थंडीचा कडाका कायम
मुंबई : राज्याला भरलेली हुडहुडी कायम असून परभणी जिल्ह्यात गारठ्याने दोघा ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. सातपुड्यातील अक्कलकुवा तालुक्यातील डाब परिसरात (जि. नंदूरबार)सकाळी हिमकणांचा वर्षाव होऊ लागला आहे.
विदर्भात थंडीची लाट कायम असून ही परिस्थिती आणखी दोन दिवस तरी कायम राहिल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. मुंबईच्या किमान तापमानात गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी दोन अंशाची वाढ झाली असली तरीदेखील शहरातला थंडीचा कडाका कायम आहे. शुक्रवारी मुंबईचे किमान तापमान १३.६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून, गुरुवारी हेच किमान तापमान ११ अंशाच्या आसपास नोंदवण्यात आले होते. विदर्भाबरोबरच खान्देशात थंडीचा कडाका खूपच वाढला आहे. परभणी जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडाभरापासून थंडीची लाट आहे. पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथील विश्वनाथ सखाराम दुधाटे (वय ७६) आणि जिंतूर येथील राधाकिशन कोद्रे (वय ६५) यांचा गारठ्याने मृत्यू झाल्याचे उघड झाले. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात देखील सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे.
धुळे येथे तापमान ४.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. गेल्या २६ वर्षातील धुळ्याचे हे सर्वात कमी तापमान ठरले. याआधी २ जानेवारी १९९१ रोजी धुळ्याचा पारा २़४ अंश सेल्सिअस एवढा घसरला होता. (प्रतिनिधी)