सणासुदीच्या दिवसांत नारळ महागला; केरळ महापुराचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 05:25 IST2018-08-24T04:10:51+5:302018-08-24T05:25:33+5:30
२० ते ४० रुपयांपर्यंत भाव, श्रावण सुरू असल्याने नारळाला अधिक मागणी

सणासुदीच्या दिवसांत नारळ महागला; केरळ महापुराचा परिणाम
कोल्हापूर : केरळातील महापुरामुळे आवक कमी झाल्याने ऐन सणासुदीच्या तोंडावर नारळाचे दर भडकले आहेत. घाऊक बाजारात १० ते २० टक्क्यांपर्यंत दर वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकाला एका नारळासाठी प्रतिवारीप्रमाणे किमान २० रुपयांपासून ४० रुपये मोजावे लागत आहेत.
व्रतकैवल्यांचा महिना असणारा श्रावण सुरू झाल्याने नारळाची मागणी अगोदरच वाढली आहे. त्यातच नारळांचे आगार समजल्या जाणाऱ्या केरळला महापूराचा फटका बसल्याने तिकडून होणारी आवक चांगलीच रोडावली आहे. आता गणेशोत्सव तोंडावर आला आहे. या काळात नारळाला सर्वात जास्त मागणी असते. परंतु आतापासून दर वाढू लागले आहेत.
त्यामुळे येत्या काही दिवसांत केरळमधून आवक सुरू झाली तरी दर असेच चढे राहतील, असा व्यापाºयांचा अंदाज आहे.
केरळमधून नियमित नवा पाणी, जुना पाणी, बोळ, कंगणार, आदी जातींचे नारळ विक्रीसाठी राज्यात येतात. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये प्रामुख्याने बोळ नारळाचा वापर केला जातो. त्यामुळे या नारळाचे दर कायम चढेच असतात. सध्या किरकोळ बाजारातील त्याचे दर आणखी वाढून ४० ते ५० रुपये प्रतिनग असा झाला आहे.
मुंबईच्या एपीएमसी बाजारात तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतून नारळाची सर्वाधिक आवक होते. त्यामुळे केरळमधून आवक रोडावल्याचा परिणाम अजून तरी दिसत नाही. परंतु श्रावणाच्या तोंडावर दर वाढले असून त्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते, असे व्यापाºयांनी सांगितले.
नारळाचे दर असे (घाऊक बाजार)
मोठा जुना पाणी नारळ - शेकडा दर १३५० रुपये (पूर्वी १२५० )
लहान जुना पाणी नारळ - शेकडा दर १३००
(पूर्वी १४००)
कंगणार - शेकडा दर - १५००
बोळ (हॉटेल किंग) आकारानुसार -शेकडा दर - २८०० ते ३०००