सहकारमंत्र्यांचा साखर कारखाना पाडला बंद; शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:54 IST2017-11-19T00:54:07+5:302017-11-19T00:54:16+5:30
ऊसदराचा प्रश्न अद्याप न सुटल्याने जिल्ह्यात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आंदोलक शेतक-यांनी शनिवारीही हल्लाबोल करीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा भंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखाना बंद पाडला.

सहकारमंत्र्यांचा साखर कारखाना पाडला बंद; शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक
सोलापूर : ऊसदराचा प्रश्न अद्याप न सुटल्याने जिल्ह्यात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आंदोलक शेतकºयांनी शनिवारीही हल्लाबोल करीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा भंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखाना बंद पाडला. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करण्यात आले.
लोकमंगल साखर कारखान्यासमोर बळीराजा संघटना व संयुक्त शेतकरी संघटनेचे दुसºया दिवशीही धरणे आंदोलन सुरूच होते. रात्री भजनी मंडळाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. शेतकºयांनी स्वत:हून ऊसतोडणी बंद केली आहे. त्यामुळे शुक्रवारी मध्यरात्रीपासून गाळप ठप्प झाले आहे. तर पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस दरवाढीच्या मागणीसाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. कारखाने चालवायचे जमत नसेल तर राजीनामे द्या. प्रशासक बसवून आम्ही चालवून दाखवू, असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी यावेळी दिले.
बार्शी तालुक्यातील वैराग येथील शिवाजी चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रस्ता रोको करण्यात आला. दोन तास चाललेल्या रस्ता रोको आंदोलनामुळे बार्शी, सोलापूर, माढा, मोहोळ, उस्मानाबाद आदी ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती. कुर्डूवाडी- बार्शी रोडवरील रिधोरे येथील सीना नदीच्या पुलावर मध्यभागी टायर जाळून टाकल्याने दोन तास वाहतुकीची कोंडी झाली होती़
माळशिरस तालुक्यात रयत क्रांती संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, मनसे, काँग्रेस या पक्षांच्यावतीने सोमवारी माळशिरस येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऊस तोडणी थांबविण्याच्या सूचना कामगारांना दिल्या आहेत़
आंदोलनामुळे दोन तास वाहतूककोंडी
दोन तास चाललेल्या रस्ता रोको आंदोलनामुळे बार्शी, सोलापूर, माढा, मोहोळ, उस्मानाबाद आदी ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती.
कुर्डूवाडी- बार्शी रोडवरील रिधोरे येथील सीना नदीच्या पुलावर मध्यभागी टायर जाळून टाकल्याने दोन तास वाहतुकीची कोंडी झाली होती़
साखर कारखान्यांचे काटे तपासणीसाठी आकस्मिक पथक - गिरीश बापट
साखर कारखान्यांकडे असलेल्या काट्यांच्या गुणवत्तेत दोष असल्याच्या तक्रारी आहेत़ त्यामुळे त्यांच्या तपासणीसाठी आकस्मिक तपासणी पथके नेमली नेमल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. साखर कारखान्यांमध्ये उसाच्या वजनासाठी इलेक्ट्रॉनिक्स काटे लावण्यासंदर्भात मागणी सुरु आहे. त्या संदर्भात भविष्यात निर्णय होईलच. मात्र सध्या तरी ही उपाययोजना केली आहे, असेही बापट म्हणाले.
रेशन दुकानदारांच्या संदर्भातील प्रकरणांच्या सुनावणीसाठी आता दुकानदारांना मुंबईत बोलावण्याऐवजी आम्हीच त्यांच्या गावात जाऊन सुनावणी घेत आहेत. त्या अंतर्गत सोलापुरात ५१, पुण्यात ८५, नाशिक ९६ आणि औरंगाबादमध्ये १२५ दुकानदारांच्या प्रकरणांवर सुनावण्या झाल्या आहेत. राज्यात सव्वातीन हजार सुनावण्या या तीन दिवसांत झाल्या असून, २०१७ च्या अखेरपर्यंत सर्व प्रकरणे निकाली काढली जाणार आहेत, असेही बापट म्हणाले.
पॉस मशिनच्या माध्यमातून राज्यातील ५२ हजार ८०० रेशन दुकाने जोडण्याचा मानस आहे. आतापर्यंत ५१ हजार ५०० दुकानांमध्ये पॉस मशिन दिल्या आहेत. राज्यात असलेल्या १० ते १२ लाख बोगस शिधापत्रिकाधारक बायोमेट्रिक प्रणालीमुळे आपोआपच बाद होतील. त्यातून तीन ते चार हजार कोटींच्या अन्नधान्याची बचत होईल.
द्वारपोच योजनेच्या माध्यमातून दुकानदारांच्या दारापर्यंत धान्य पोहोचविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे हमालीवरील खर्च वाचला असून, २० जिल्ह्यात हे काम सुरु आहे. १५० गोदामांची संख्या वाढली असून, नव्याने गोदाम निर्माण केले जाणार आहेत, अशी माहिती बापट यांनी दिली.