ही खुर्ची तुमची आहे; मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' प्रेमळ आदेशाची जिल्ह्यात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 04:50 PM2020-01-19T16:50:24+5:302020-01-19T16:50:29+5:30

उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आदरामुळे तहसीलदार भारावले

cm uddhav thackeray urge Tehsildar to seat on chair in sangli | ही खुर्ची तुमची आहे; मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' प्रेमळ आदेशाची जिल्ह्यात चर्चा

ही खुर्ची तुमची आहे; मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' प्रेमळ आदेशाची जिल्ह्यात चर्चा

Next

सांगली:  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या एका कृतीची सध्या सांगलीत जोरदार चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वी इस्लामपूरमधल्या वाळवा तहसील कार्यालयाच्या नव्या वास्तूच्या उद्घाटनासाठी उद्धव ठाकरे आले होते. उद्घाटन केल्यानंतर उद्धव यांनी संपूर्ण इमारतीची पाहणी केली. तळमजल्यावर असलेल्या तहसीलदारांच्या खुर्चीत मुख्यमंत्री काही वेळ बसले. मात्र लगेचच त्यांनी थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या तहसीलदारांना हाताला धरुन खुर्चीजवळ आणलं आणि त्यांना खुर्चीत बसवलं.

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री वाळवा तहसील कार्यालयाच्या उद्घाटनाला आले होते. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासह इतर मंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित होते. फित कापून कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री व सर्व मान्यवर इमारतीमधल्या दालनांची पाहणी करू लागले. वरच्या मजल्यावरील बैठक सभागृह पाहून मुख्यमंत्री सर्वात शेवटी खालच्या मजल्यावरील तहसीलदारांच्या दालनापाशी आले. इमारतीमधलं प्रमुख कार्यालय असल्यानं मुख्यमंत्र्यांनी आत जाऊन कार्यालयाची रचना पाहायला सुरुवात केली. 

यावेळी तहसीलदारांच्या कार्यालयात घडलेल्या एका प्रसंगाची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे. तहसीलदारांच्या दालनात पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री खुर्चीत बसले. काही वेळ बसल्यानंतर अचानक मुख्यमंत्री खुर्चीवरुन उठले आणि थोड्या दूरवर उभ्या असलेल्या तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे गेले. त्यांनी सबनीस यांना हाताला पकडून खुर्चीजवळ आणलं आणि काही कळायच्या आत त्यांना फर्मावलं 'तुम्ही तहसीलदार आहात ना? मग ही खुर्ची तुमची आहे... बसा इथे.' अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सबनीस काहीसे गांगरले. जिल्हाधिकारी, मंत्री, राज्यमंत्री उपस्थित असल्यानं मी इथे बसू शकत नाही, असं नम्रपणे सबनीस यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. 

सबनीस यांनी खुर्चीवर बसण्यास नम्रपणे नकार दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांना अतिशय प्रेमळ शब्दांत समजावलं. 'ही तुमची इमारत आहे. याठिकाणी तुम्ही प्रमुख म्हणून  काम पाहणार आहात. ही तुमची खुर्ची आहे. या खुर्चीवर माझ्या हस्ते तुम्हाला स्थानापन्न करायचं आहे', अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सबनीस यांना खुर्चीत बसण्याचा आग्रह केला. मुख्यमंत्र्यांचा आग्रह पाहून सबनीस खुर्चीत बसले. 'या महत्वाच्या पदावर तुम्ही आहात. तुम्हाला मी स्वत: बसवलं आहे. त्यामुळे काम पण चोखपणेच करा', असं सांगून मुख्यमंत्र्यांनी सबनीस यांची पाठ थोपटली.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या प्रेमळ वागणुकीनं रवींद्र सबनीस आश्चर्यचकीत झाले. 'मुख्यमंत्री उद्घाटन करून तिथून निघूनही गेले. पण तेव्हापासून मी जेव्हा जेव्हा या नवीन दालनातल्या माझ्या खुर्चीवर बसतो, तेव्हा तेव्हा मला शेजारी राज्याचे मुख्यमंत्री उभे आहेत असा भास होतो,' असं रवींद्र सबनीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सन्मानामुळे आपली जबाबदारी आणखी वाढल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. 
 

Web Title: cm uddhav thackeray urge Tehsildar to seat on chair in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.