मुख्यमंत्री वेळ देत नसल्याने अखेर राणेंच्या पुस्तकाचे पवार-गडकरींच्या हस्ते प्रकाशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 17:26 IST2019-08-13T17:11:10+5:302019-08-13T17:26:27+5:30
आपल्या आत्मचरित्रामध्ये राणेंनी शिवसेनेबाबत अनेक गौप्यस्फोट केले असल्याचे बोलले जात आहे. त

मुख्यमंत्री वेळ देत नसल्याने अखेर राणेंच्या पुस्तकाचे पवार-गडकरींच्या हस्ते प्रकाशन
मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा असलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या 'नो होल्ड्स बार्ड' या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचा मुहूर्त ठरला असून, १६ ऑगस्ट रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नारायण राणे यांच्या पुस्तक प्रकाशनाला वेळ देत नसल्याने आता, राणेंच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन खासदार शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.
आपल्या आत्मचरित्रामध्ये राणेंनी शिवसेनेबाबत अनेक गौप्यस्फोट केले असल्याचे बोलले जात आहे. तर, राणेंच्या आत्मचरित्रांतील काही पाने माध्यमांच्या हाती लागली होती. त्यात, जर नारायण राणे पक्षात राहिले तर मी आणि रश्मी ठाकरे घर सोडून जाऊ अशी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना धमकी दिल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला होता. त्यामुळे राणे यांचा आत्मचरित्राच्या प्रकाशनाने शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे. तर विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाराजी ओढवून घ्यायची नसल्याने ते प्रकाशनाला वेळ देत नसल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री वेळ देत नसल्याने आणि आत्मचरित्र निवडणुकीआधी प्रकाशित करायचे असल्याने राणे यांनी दोन पुस्तकांचे प्रकाशन खासदार शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करणार आहेत. मुबईत शुक्रवारी हे प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. ४ ऑगस्टला हा प्रकाशन सोहळा होणार होता. पण मुख्यमंत्र्यांच्या वेळ उपलब्ध नसल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. राणे यांच्या आत्मचरित्र प्रकाशनानंतर उद्धव ठाकरे यांना हादरे बसणार असल्याचा इशारा याधीच आमदार नितेश राणे यांनी दिला होता. त्यामुळे राणेंच्या आत्मचरित्र प्रकाशनानंतर नेमके काय गौप्यस्फोट होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात पहायला मिळत आहे.