एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार; "२०१९ ला तुम्ही जोडे धुवायला गेला होता की..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 19:02 IST2023-04-27T19:02:05+5:302023-04-27T19:02:44+5:30
हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. त्यांच्यावर अन्याय करणार नाही. लोकांच्या हिताचा निर्णय घेईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ग्वाही दिली.

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार; "२०१९ ला तुम्ही जोडे धुवायला गेला होता की..."
पालघर - सर्वसामान्य जोडे पुसणारा हा विश्वासू असतो तुमच्यासारखा विश्वासघातकी नसतो. त्यामुळे मुजोरीपणा करणाऱ्यांना मतपेटीतून जनता नक्की जोडे मारेल असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पावरून ठाकरेंनी केलेल्या टीकेला एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
कंत्राटदार नेते बनायला लागले अन्...; उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, २०१९ ला जोडे पुसायला कोण गेले होते? जोडे धुवायला गेले होते की डोक्यावर घ्यायला गेले होते? हे लोकांना माहिती आहे. हा द्वेष, मत्सर आहे. सर्वसामान्य माणसाबाबत राग आहे. चहावाला, टपरीवाला, रिक्षावाला सर्वसामान्य माणसं नेतृत्व करायला लागतात तेव्हा अशाप्रकारे पोटदुखी होते. त्यातूनच अशी प्रतिक्रिया येते असं त्यांनी म्हटलं.
तसेच बारसू इथं रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. त्यानंतर मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर भूमिका बदलली त्याचे कारण काय? याचा शोध जनतेने घेतला पाहिजे. ही दुटप्पी भूमिका वारंवार घेतली जाते. समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पालाही हीच भूमिका घेतली होती. परंतु समृद्धी महामार्ग हा गेमचेंजर प्रकल्प आम्ही केला. त्याला नावही बाळासाहेबांचे दिले. बारसूचा प्रकल्प सर्वसामान्यांना विश्वासात घेऊनच, कुणावरही अन्याय न करता हा प्रकल्प लोकांच्या हितासाठी केला जाईल. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. त्यांच्यावर अन्याय करणार नाही. लोकांच्या हिताचा निर्णय घेईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ग्वाही दिली.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
महाराष्ट्रातून चांगले प्रकल्प दुसऱ्या राज्यात जात आहेत आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणारे प्रकल्प राज्यात आणले जातायेत. एअरबस, वेदांता हे प्रकल्प राज्यात का आणले नाहीत? रिफायनरी प्रकल्पाबाबत सत्य काय हे लोकांना कळाले पाहिजे. ग्रीन रिफायनरी असेल तर मारझोड कशाला करतायेत? तुमच्यात आत्मविश्वास असेल तर जनतेसमोर जावे. सध्या मुख्यमंत्री स्वत:च्या शेतात फिरतायेत आणि तिकडे लोक रस्त्यावर उतरलेत अशी टीका ठाकरेंनी केली होती. त्याचसोबत अलीकडेच जोडे बनवणारी कंपनीही तामिळनाडूत गेली. जोडे पुसण्याची लायकी असलेले लोक राज्य करतायेत. महाराष्ट्राचे होणार काय? माझ्या पाठित वार करून सरकार पाडले. त्याचा सूड आणि बदला घेणारच असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला होता.