आमदार अनिल बाबर यांच्या अंत्यदर्शनासाठी CM शिंदे सांगलीला जाणार, 'कॅबिनेट' रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 10:05 AM2024-01-31T10:05:19+5:302024-01-31T10:05:49+5:30

"शिवसेनेचा समाजकार्याचा वारसा चालवणारा सच्चा लोकप्रतिनिधी गमावला"; CM शिंदेंनी व्यक्त केल्या शोकभावना

CM Eknath Shinde to attend funeral of Anil Babar at Sangli so Cabinet meeting canceled | आमदार अनिल बाबर यांच्या अंत्यदर्शनासाठी CM शिंदे सांगलीला जाणार, 'कॅबिनेट' रद्द

आमदार अनिल बाबर यांच्या अंत्यदर्शनासाठी CM शिंदे सांगलीला जाणार, 'कॅबिनेट' रद्द

CM Eknath Shinde on Anil Babar Death: आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. तसेच अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या. आज सकाळी बाबर यांचे निधन झाले. ही बातमी समजताच मुख्यमंत्री शिंदे यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळाची आज होणार बैठकही रद्द केली असून ते दुपारी स्वत: अंत्यदर्शनाला सांगलीला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

"आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघांमध्ये त्यांनी शिवसेनेचे केलेले कार्य कधीही न विसरण्याजोगे आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी सिंचनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते. बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो, अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले. 
त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावला आहे," असे मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

दर आठवड्याला होणारी आज कॅबिनेट बैठक रद्द

राज्य मंत्रिमंडळाकडे चर्चेत असलेले अनेक प्रश्न आणि समस्या यांच्यावर तोडगा काढण्यासाठी तसेच विविध नव्या योजनांवर संवाद साधण्यासाठी दर आठवड्याच्या बुधवारी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या बैठकीला उपस्थित असतात. मात्र आज सकाळीच अनिल बाबर यांच्या निधनाची बातमी येऊन धडकली. त्यानंतर शिंदे गटाचे वातावरण शोकाकूल झाले. तसेच, आपले सहकारी असलेल्या आमदाराच्या अंत्यदर्शाला सांगलीला जाण्याचेही मुख्यमंत्र्यांनी ठरवले. त्यामुळे आजची कॅबिनेट बैठक रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

आज सकाळी बाबर यांचे निधन

शिवसेनेचे (शिंदे गट) विद्यमान आमदार अनिल बाबर (वय ७४) यांचे निधन झाले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्याने त्यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनिल बाबर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार म्हणून ओळख होती. शिवसेनामध्ये फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. सांगलीच्या खानापूर मतदारसंघाचे अनिल बाबर प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्या अकाली निधनाच्या बातमीने सांगली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. २०१९च्या निवडणूकीत अनिल बाबर यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. अनिल बाबर यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असा राजकीय प्रवास आहे. अनिल बाबर हे ४ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. १९९०, १९९९, २०१४, २०१९ ला आमदारकीला ते निवडून आले होते. 

Web Title: CM Eknath Shinde to attend funeral of Anil Babar at Sangli so Cabinet meeting canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.