मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे वाचला शाळकरी मुलीचा जीव; तातडीनं एअरलिफ्टची केली सोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 10:44 IST2024-02-21T10:43:48+5:302024-02-21T10:44:52+5:30
१६ वर्षीय निधी दोन दिवसांपूर्वी घराच्या दुसऱ्या मजल्यावरून कोसळली. तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे वाचला शाळकरी मुलीचा जीव; तातडीनं एअरलिफ्टची केली सोय
मुंबई - राज्यात एकीकडे मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. आरक्षणासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. या सर्व धावपळीत मुख्यमंत्र्यांपासून सर्व सरकार व्यस्त होते. त्यात छत्रपती संभाजीनगरच्या एका शाळकरी मुलीचा दुसऱ्या मजल्यावरून पडून अपघात झाल्याचे मुख्यमंत्री शिंदेना कळाले. त्यानंतर संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी तातडीने या मुलीचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक सूचना त्यांच्या वैद्यकीय पथकाला दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून दोन वेळा दूरध्वनीवरून त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांच्याशी संपर्क साधून मुलीच्या तब्येतीचा आढावा घेतला. त्याचसोबत मुलीच्या उपचारात कुठलीही अडचण नको यासाठी योग्य ती खबरदारी करण्याचे आदेश त्यांनी दिले. दुसऱ्या मजल्यावरून पडून या मुलीचा अपघात झाला होता. त्यामुळे तिला अत्यावश्यक उपचारासाठी एअरलिफ्ट करण्याची गरज होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने तिला तातडीने हवाई रुग्णवाहिकेने मुंबईला आणलं असून सध्या या मुलीवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
१६ वर्षीय निधी दोन दिवसांपूर्वी घराच्या दुसऱ्या मजल्यावरून कोसळली. तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तिला अत्यावश्यक उपचारांची गरज होती. अशावेळी तिथल्या स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर ही गोष्ट टाकली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनीही या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पाऊले उचलली. त्यानंतर या मुलीला एअरलिफ्ट करून मुंबईच्या लीलावती रुग्णालयात आणले.
दरम्यान, २०२२ मध्येही एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान होताच एका आठवड्याच्या आत मध्येच बिहारच्या पटना येथे एका मराठी कुटुंबाच्या घरामध्ये स्फोट झाला होता. यामध्ये सदर कुटुंबातील आई-वडिलांचे निधन झाले होते तर दोन गंभीररित्या भाजलेल्या मुलांना उपचाराची गरज होती. ही बाब मुख्यमंत्री शिंदेंना समजली त्यादिवशी रात्री शिंदे चिवटे यांना फोन करून "या दोन मुलांच्या आजीला मी शब्द दिला आहे की तुझे नातू उद्याचा उगवायच्या आत महाराष्ट्रात परत आलेले असतील आणि त्यांच्यावर योग्य उपचार सुरू झालेले असते काळजी करू नका...!!" पुढे म्हणाले, "राजेश कवळे यांच्याशी बोलून घे आणि तात्काळ हवाई रुग्णवाहिकेची व्यवस्था करा पुण्यातील सूर्य सह्याद्री हॉस्पिटलमध्ये बेड आरक्षित करा असे आदेश दिले होते.