टॅक्सी - रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ, विमा, मुलांना नोकरी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 20:10 IST2024-06-18T20:10:23+5:302024-06-18T20:10:43+5:30
खऱ्या शिवसैनिकांचा उद्या वर्धापन दिन आहे, जल्लोषात साजरा होईल, असेही शिंदे यांनी सांगितले.

टॅक्सी - रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ, विमा, मुलांना नोकरी...
राजकारणात येण्यापूर्वी एकनाथ शिंदे रिक्षा चालक होते, असे सांगितले जाते. काहीवेळा शिंदे यांनीही याचा उल्लेख केला आहे. अखेर या टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी एक रिक्षावालाच धावून आला आहे. आज शिंदे यांनी या चालकांसाठी कल्याणकारी मंडळ निर्माण केल्याची घोषणा केली.
लाखो टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ काम करेल. त्यांच्या कुटुंबाला विमा संरक्षण दिले जाईल. ज्यांची मुले आहेत त्यांना देखील नोकरी देण्यासाठी जर्मनी सोबत एक करार केला आहे. या महामंडळामध्ये तात्काळ दुखापत होईल त्याला पन्नास हजार रुपये देण्याची तरतूद केली आहे. ग्रॅच्युईटी दिली जाईल, यासाठी वर्षाला ३०० रुपये भरावे लागतील, असे शिंदे म्हणाले.
यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. सरकारमध्ये असताना त्यांना बाळासाहेब यांच्या बद्दल काही करता आले नाही. आमच्या सरकारने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने समृद्धी महामार्ग सुरू केला. ठाकरे यांचे स्मारक आम्ही युद्ध पातळीवर पुढे नेत आहोत. त्यांच्या विचारांचे हे सरकार आहे. आज बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतात त्यांचे व्होट शेअर 42 टक्के आहे आणि आमचे 48 टक्के आहे. लोक आमच्या सोबत आहेत, असा दावा शिंदे यांनी केला.
ज्या ठिकाणी यांचा विजय झाला त्या ठिकाणचे ईव्हीएम योग्य आहे असे म्हणतात. जिथे हरले तिथे गडबड असल्याचे म्हणतात. रविंद्र वायकर यांच्या विजयामुळे हे हैराण झाले आहेत. गिरे तो भी टांग उपर अशी यांची अवस्था आहे, अशी टीका शिंदे यांनी केली. खऱ्या शिवसैनिकांचा उद्या वर्धापन दिन आहे, जल्लोषात साजरा होईल, असेही शिंदे यांनी सांगितले.