CM Devendra Fadnavis In Latur PC News: दोन नद्यांच्या संगमामुळे पात्र वाढत जाते आणि सगळे पाणी आजूबाजूच्या परिसरात शिरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. सगळीकडे पाणीच दिसत आहे. पिकांचे नुकसान तर आहेच, पण जमीन वाहून जात आहे. शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत सरकार म्हणून करणार आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औराद शहाजनी, ता. निलंगा, जि. लातूर येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, आमदार संभाजी पाटील निलंगेकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. येथील समस्या आम्ही जाणून घेत आहोत. काही कामे येथे आधी करावी लागतील. अशा प्रकारच्या घटना सातत्याने वाढत आहेत. महिन्याभराचा पाऊस तीन दिवसांत पडतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाढते. दोन नद्यांच्या संगमामुळे एका नदीचा प्रवाह अडतो आणि ते सगळे पाणी आतमध्ये येते. संभाजी पाटील निलंगेकर यांनी काही सुधारणा सुचवल्या आहेत, त्या करून घेणार आहोत. या ठिकाणी एक पूर संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. तरच या ठिकाणच्या शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना मदत करू शकू.
ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार
शेतकऱ्यांना सगळी मदत आम्ही करणार आहोत. टंचाईवेळीचे नियम अतिवृष्टीलाही लागू करणार आहोत. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत केली जाणार आहे. जेवढे पंचनामे येत आहेत, त्यावर कार्यवाही सुरू केलेली आहे. जिथे शक्य नसेल, तिथे ड्रोनने पंचनामा केला तरी चालेल, हेही आम्ही सांगितले आहे. ड्रोनचा पंचनामा आम्ही मान्य करून घेऊ. सरकारी नोंद असली पाहिजे, एवढाच त्यामागचा उद्देश आहे. कोणी मोबाइलवर फोटो काढून दिला, तरी तो मान्य करू. काही अडचण नाही. यंत्रणेनेही लवचिक राहावे. अशा परिस्थितीत खूप नियम सांगू नयेत. जास्तीत जास्त मदत करावी, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दिवाळीपूर्वीच आम्ही मदत देणार आहोत. एनडीआरएफचे नियम केंद्र सरकारने बदललेले आहेत. दीर्घकालीन उपाययोजना करण्यावरही भर दिला जात आहे. परंतु, आत्ता तातडीची मदत देणे आवश्यक आहे. इथे सांगू इच्छितो की, पंचनामे येतील, मग मदत देऊ. सहा महिने अनेक ठिकाणी मदत मिळत नाही. ही पद्धत आम्ही बदललेली आहे. एका तालुका, एका गावाचे आले, तरी लगेच मदत करत आहोत. २२०० कोटी रुपये आम्ही दिलेले आहेत. दिवाळीपूर्वी आम्ही सगळ्यांना मदत करू, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.