सांगली - राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर अडचणीत सापडले आहे. सर्वच स्तरातून पडळकरांच्या विधानाचा निषेध होत असून भाजपानेही त्यांच्या विधानापासून फारकत घेतली आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या विधानाची गंभीर दखल घेत आमदार पडळकरांना फोन करून समज दिली आहे.
याबाबत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला होता. अशाप्रकारची वक्तव्ये करू नका अशी सूचना मला मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मी त्यांच्या सूचनेचे पालन करेन असं पडळकरांनी सांगितले आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईवर बोलले, एआयचा वापर करून व्हिडिओ तयार केला तेव्हाही पवारांनी मोदींना फोन करून निषेध व्यक्त केला होता का? हे कुठे माध्यमांत असेल तर दाखवा. जयंत पाटील यांची माफी कशासाठी मागायची? असा उलटा प्रश्नही त्यांनी पत्रकारांना केला.
तर मी या विषयावर काही बोलणार नाही असं विधान जयंत पाटील यांनी केले आहे. मात्र जयंत पाटील समर्थक गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. सांगलीत पाटील समर्थकांनी पडळकरांविरोधात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे विधान केले ते योग्य नाही. कुणाच्याही वडिलांबाबत अथवा कुटुंबाबद्दल विधान करणे योग्य नाही. याबाबत गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललो आहे. त्यांना समज दिली आहे. या विषयावर शरद पवारांचाही मला फोन आला होता. मी त्यांनाही आम्ही अशा विधानांचे कधीच समर्थन करणार नाही असं सांगितले. गोपीचंद पडळकर हे तरूण आणि आक्रमक नेते आहेत. आक्रमकता दाखवताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवूनच आक्रमकता ठेवली पाहिजे. तुम्हाला आयुष्यात चांगला नेता म्हणून संधी आहे. परंतु आपल्या बोलण्यामुळे काय अर्थ निघतील याची काळजी घ्यावी असा सल्ला मी पडळकरांना दिला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवारांनी टोचले कान
दरम्यान, वादग्रस्त विधानांसंदर्भात महायुतीचे धोरण ठरलेले आहे. भाजपच्या संदर्भातील जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे. ते यावर बोलतील. गोपीचंद पडळकर यांनी काय विधान केलं, याची माहिती सध्या तरी माझ्याकडे नाही. पण, मी याच विचाराचा आहे की, कोणी कोणत्याही राजकीय विचारांचा असो...आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा आहे. एक संस्कृती आहे असं अजित पवारांनी म्हटलं होते.