मुंबई - निशिकांत दुबे यांचे विधान पूर्ण ऐकले तर त्यांनी संघटनेबाबत बोलले आहेत. मराठी माणसाला सरसकट म्हटलं नाही तथापि असं विधान करणे माझ्या मते योग्य नाही. त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. मराठी माणसांचे ऐतिहासिक योगदान महाराष्ट्रात प्रचंड मोठे आहे. जेव्हा भारतावर परकीय आक्रमण झाली तेव्हा इथल्या संस्कृतीचे रक्षण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी केले. मराठी माणसाने परकीय आक्रमणाविरोधात लढाई केली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
निशिकांत दुबे यांच्या विधानावर पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला होता. त्यावेळी ते म्हणाले की, पानीपतची लढाई मराठे लढले होते. अहमद शाह अब्दालीने स्पष्टपणे तहाचे पत्र दिले होते. पंजाबपासून पेशावरपर्यंत भाग आम्हाला देऊन टाका, उर्वरित भारत हा मराठ्यांचा आहे हे आम्ही मान्य करू. परंतु मराठ्यांनी ते मान्य केले नाही. अखंड भारत वाचवण्यासाठी मराठे पानीपतच्या लढाईला गेले होते. त्यामुळे हा मराठ्यांचा इतिहास आहे. आजही देशाच्या जीडीपीमध्ये सर्वात जास्त योगदान देणारा आमचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसांचे योगदान या देशाच्या इतिहासात आणि वर्तमानात कुणीच नाकारू शकत नाही. कुणी नाकारत असेल तर अत्यंत चुकीचे आहे असंही फडणवीसांनी म्हटलं.
काय म्हणाले होते निशिकांत दुबे?
महाराष्ट्र कुणाच्या पैशांची भाकरी खातो? तिकडे टाटा, बिर्ला व रिलायन्स असेल. पण त्यांचा कोणताही कारखाना महाराष्ट्रात नाही. बिहार, झारखंड नसते तर टाटा व बिर्ला यांनी काय केले असते? टाटा, बिर्ला व रिलायन्स मुंबईत टॅक्स भरतात; पण टाटांनी पहिला कारखाना बिहारमध्ये उघडला. महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो. तुम्ही कोणता टॅक्स आणता? उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे फक्त उत्तर भारतीयांना लक्ष्य करत आहेत. तुम्हाला मारायचे असेल तर मग मुंबईतील तामिळी, तेलुगू आणि उर्दू सगळ्या भाषिकांना मारा. आम्ही मराठीचा सन्मान करतो; पण ही हुकूमशाही खपवून घेणार नाही असं वादग्रस्त विधान भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी केले होते.
दरम्यान, निशिकांत दुबे यांच्या विधानावरून संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर संताप व्यक्त केला आहे. तुम्ही महाराष्ट्राचे आहात. भाजपा खासदार मराठी माणसांविरुद्ध अशी वक्तव्य करत असताना मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ गप्प बसतात, याचे मला आश्चर्य वाटते. ते कोणत्या प्रकारचे मुख्यमंत्री आहेत? त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची नावे घेण्याचा अधिकार नाही. स्वतःला दुटप्पी शिवसेनेचे नेते मानणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी दाढी कापावी आणि राजीनामा द्यावा अशी घणाघाती टीका उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.