भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 06:19 IST2025-10-24T06:19:25+5:302025-10-24T06:19:58+5:30
शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले.

भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : शक्तिपीठ महामार्गाला काही ठिकाणी होणारा विरोध लक्षात घेता त्याच्या नकाशात बदल करण्यात येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसेच संकेत दिले आहेत. सोलापूर, सांगली तसेच कोल्हापूरमध्ये हे बदल होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे समृद्धी महामार्गाच्या गडचिरोली, गोंदियापर्यंतच्या विस्ताराच्या दोन ते तीन निविदा रद्द करण्यात आल्या आहेत, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. नागपुरात रामगिरी या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेदरम्यान त्यांनी यावर भाष्य केले.
समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीपर्यंत करण्याचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा मानस आहे. महामंडळाने तीन महामार्ग प्रकल्पांच्या निविदा काढल्या होत्या. त्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारणा करण्यात आली असता त्या निविदा रद्द करण्यात आल्याचे सांगितले. भूसंपादन न करता त्या निविदा काढल्या होत्या. तसेच त्यांचे दर जास्त होते. त्यामुळे त्यांना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
जातींच्या प्रश्नावरून राजकारण नको
कोणत्याही निवडणुका जवळ आल्या की जात आणि त्याच्याशी निगडित गोष्टी उकरून काढून राजकारण केले जाते. जातीचा मुद्दा मतदारांपेक्षा नेत्यांच्या मनात जास्त प्रमाणात असतो, असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपल्यावर जातीविषयक विषय मागे पडतील. जातींचे प्रश्न आहेतच; मात्र, त्यावरून राजकारण करणे अयोग्य आहे, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
आता शहरी नक्षलवादाचे राज्यापुढे मोठे आव्हान
गडचिरोलीतील नक्षलवादावर नियंत्रण मिळवले आहे. मात्र, आता शहरी नक्षलवादाचे आव्हान आहे. जंगलातील नक्षलवाद्यांच्या रूपात शत्रू कोण हे माहिती होते. मात्र, शहरी नक्षलवाद्यांत नेमका शत्रू कोण हे स्पष्ट होत नाही. शहरी नक्षलवादी तरुण पिढी, विद्यार्थ्यांच्या डोक्यात चुकीचे खूळ भरून त्या माध्यमातून ते अराजकतेचे बीजारोपण करतात. त्यातून संवैधानिक प्रक्रियेचे विरोधक वाढविण्याचा प्रयत्न असतो. मात्र, सरकार त्यांचा पराभूत करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.