“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 15:54 IST2025-07-12T15:50:30+5:302025-07-12T15:54:02+5:30
CM Devendra Fadnavis News: छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले हे जागतिक वारसा स्थळ घोषित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
CM Devendra Fadnavis News: छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले हे जागतिक वारसा स्थळ घोषित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले. खरे म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्याकडे सात वेगवेगळ्या संस्था गेल्या होत्या. पण तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. कारण त्यांनी त्यापैकी हा निर्णय केला की, जागतिक वारसा स्थळ म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले नामनिर्देशित करण्यासाठी प्रयत्न केले. यातील ११ किल्ले हे महाराष्ट्रात आहेत आणि एक किल्ला तमिळनाडूमध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने घोषित केल्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जगाच्या नकाशावर आले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. या १२ किल्ल्यांचे स्थापत्य कशा प्रकारे तयार करण्यात आले? याच्या जागा कशा शोधण्यात आल्या? नैसर्गिक गोष्टीत कशा प्रकारे स्थापत्य तयार करण्यात आले? कशा प्रकारे किल्ल्यांचे दरवाजे तयार करण्यात आले? अशा अनेक गोष्टी आपण युनेस्कोसमोर ठेवल्या. ही सर्व प्रक्रिया जवळपास एक वर्ष सुरू होती. त्यांच्या काही अधिकाऱ्यांनी किल्ल्यांना भेटी दिल्या, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीसाठी मतदान करण्यासाठी २० देशांना मतदान करण्याचा अधिकार आहे. त्या देशांच्या राजदूतांसोबत आम्ही संवाद साधला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि सचिवांनी संवाद साधला. आम्ही यासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. केंद्र सरकारच्या माध्यमातून संबंधित २० देशांशी आम्ही संवाद साधला. मध्यंतरी युक्रेनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांनी सांगितले की, आम्ही युनेस्कोमध्ये भारताच्या बाजूने मतदान करू. २० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले हे जागतिक वारसा स्थळ घोषित करण्यात आले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जगाच्या नकाशावर आले
१२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित करण्यात आल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे जगाच्या नकाशावर आले आहेत. आता युनेस्कोच्या सर्व संकेतस्थळावर या किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती उपलब्ध होणार आहे. वर्ल्ड टुरिझम मॅपवर हे किल्ले येणार आहेत. तसेच युनेस्कोच्या माध्यमातून जागतिक वारसा स्थळ म्हणून सर्व माहिती देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पर्यटनालाही चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, दुसरी राजधानी रायगड, शिवछत्रपतींचे जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला, शत्रूच्या छातीत धडकी भरविणारे साल्हेर, लोहगड, खांदेरी, प्रतापगड, सुवर्णदूर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील ११ किल्ले व तामिळनाडूतील जिंजी अशा एकूण १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही आनंदाची बातमी दिली. याबाबत संपूर्ण राज्यभरातून आनंद व्यक्त केला जात आहे.