दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 14:01 IST2025-04-28T13:19:13+5:302025-04-28T14:01:05+5:30
दहशतवादी हल्ला करतेवेळी लोकांशी बोलत बसतात का? धर्म विचारत बसतात का? असा सवाल विजय वडेट्टीवारांनी केला.

दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
CM Devendra Fadnavis on Vijay Wadettiwar: पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना ओळख पटवून वेगळं केलं आणि गोळ्या घालून ठार केले. पीडितांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना लक्ष्य केलं आणि गोळ्या घातल्या. मात्र आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे नवा वाद उफाळून आला आहे. धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत हे विधान असंवेदनशील असल्याचे म्हटलं.
२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा जीव गेला होता. दहशतवाद्यांनी धर्माबाबत विचारून ओळख पटवून पर्यटकांची हत्या केली. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना केलेल्या दाव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला. दहशतवादी हल्ला करतेवेळी लोकांशी बोलत बसतात का? धर्म विचारत बसतात का? असा सवाल वडेट्टीवारांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बोलताना वडेट्टीवारांनी मृत्यूमुखी पडलेल्याच्या कुंटुंबियांच्या जखमांवर मीठ चोळले असल्याचे म्हटलं.
"अशा प्रकारची वक्तवे करुन जे मृत्यूमुखी पडले आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम चाललं आहे. नातेवाईकांचे म्हणणं सगळ्यांनी दाखवलं. ज्यांच्या समोर मारले त्या नातेवाईकांनी सांगितले आहे. तिथे वडेट्टीवार नव्हते. इथे बसून अशा प्रकारची वक्तव्ये करुन नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणे अतिशय वाईट आहे. याला मूर्खपणा म्हणावं की काय हे मला समजत नाहीये," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"वडेट्टीवारांचे विधान हे असंवेदनशील आहे. तिथे ज्यांची हत्या झाली त्यांच्या कुटुंबियांनी जे सांगितले त्याला खोटं ठरवणं यापेक्षा जास्त असंवेदनशीलता काय असू शकते. विजय वडेट्टीवारांना पीडितांचे कुटुंबिय कधीही माफ करु शकणार नाही. असे मूर्खपणे विधान करणे हे एकप्रकारे जे आपले शत्रू आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासारखे आहे," असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
"पहलगाम हल्ला हे सरकारचं अपयश नाही का? त्यावर या सरकारमधील लोक काहीच बोलत नाहीत. हे लोक काय बोलतात तर त्यांनी (दहशतवाद्यांनी) धर्म विचारून पर्यटकांना मारलं. अरे मुळात यासाठी वेळ असतो का? प्रत्येकाच्या जवळ जाऊन, त्याच्या कानात बोलायला, त्याचा धर्म विचारायला वेळ असतो का? यावरून बरेच वाद आहेत. काही लोक म्हणाले, दहशतवाद्यांनी धर्म विचारला, तर काहीजण म्हणत आहेत की असं काही घडलं नाही. मुळात दहशतवाद्याचा धर्म किंवा त्याची कुठलीही जात नसते," असं विजय वडेट्टीवार म्हणाले.