Devendra Fadnavis: राज्याच्या राजकारणात मागील पाच वर्षांत अनेक स्थित्यंतरे झाली. राजकीय विरोधक असलेले नेते काहींचे मित्र झाले तर मित्र असलेले सोबती विरोधक म्हणून समोर उभे ठाकले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांसोबत भाजपच्या संबंधांमध्येही अनेक चढउतार आले. महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर उद्धव ठाकरेंनी भाजपविरोधात थेट भूमिका घेतली असून राज ठाकरे यांनीही अलीकडच्या काळात सत्ताधारी भाजपविरोधात सूर आळवला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं असून या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यापैकी तुमचे लाडके ठाकरे कोणते? असा प्रश्न 'एबीपी माझा'वरील कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना ते म्हणाले की, "ठाकरे असे आहेत की, आपण त्यांना लाडकं म्हणायचं आणि त्यांनी आपल्याला दोडकं म्हणायचं. कुठे भानगडीत पडता?" असं भाष्य फडणवीसांनी केलं आहे.
दरम्यान, "मागील पाच वर्षांत उद्धव ठाकरेंशी माझा संबंध राहिला नाही. माझा राज ठाकरे यांच्याशीच संबंध राहिला आहे. उद्धवजींनी संबंध तोडून टाकले. आमच्यात काही मारामारी नाही, समोर आले तर चांगलं बोलतो, नमस्कार करतो, पण संबंध म्हणून काही राहिले नाहीत," अशा भावना यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.