वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 23:27 IST2025-06-25T23:24:12+5:302025-06-25T23:27:05+5:30

CM Devendra Fadnavis News: राज्यातील जनतेला ही बातमी देताना मला आनंद होतो आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

cm devendra fadnavis give big good news to electricity consumers in the state electricity rates will be reduced | वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

CM Devendra Fadnavis News: विविध मुद्द्यांवरून राज्यात राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. राज्यात हिंदी सक्ती, शेतकरी कर्जमाफी ते लाडकी बहीण योजना अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधक महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारणाला वेग आला आहे. याच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीजग्राहकांना मोठा दिलासा देणारी बातमी दिली आहे. वीजदरात मोठी कपात करण्यात येत आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी १० टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत ५ वर्षांत २६ टक्के वीजदर कमी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

राज्यात १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्‍यांचे प्रमाण हे ७० टक्के

साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला तर १० टक्के वीजदरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या. पण, राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली. त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिला. या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहे. राज्यात १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्‍यांचे प्रमाण हे ७० टक्के आहे. त्यांच्यासाठी १० टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, आमच्या बळीराजाला दिवसा आणि खात्रीचा वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सोबतच आगामी काळात वीजखरेदी करारांमध्ये हरितऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीजखरेदी खर्चात बचत होणार आहे. त्यामुळेच हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणला मांडता आला. ही बातमी राज्यातील जनतेला देताना मला आनंद होतो आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. 

Web Title: cm devendra fadnavis give big good news to electricity consumers in the state electricity rates will be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.