मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 16:47 IST2025-07-23T16:44:40+5:302025-07-23T16:47:34+5:30
CM Devendra Fadnavis: मराठी-हिंदीच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या वादावरून राज्यपालांनी केलेले विधान चर्चेत आहे.

मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
CM Devendra Fadnavis: पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती या मुद्द्यावरून विरोधक सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. तसेच त्रिभाषा सूत्र लागू करण्यावर महायुती सरकार ठाम आहे. यातच मराठी भाषा बोलण्यावरून अनेक भागांमध्ये वाद होताना दिसत आहेत. अमराठी आणि मराठी यावरूनही राजकारण होताना पाहायला मिळत आहे. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन मोठी सभाही घेतली. मराठीच्या मुद्द्यावरून मीरा-भाईंदर येथेही वाद झाला. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलेले विधान चर्चेत असून, यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील ‘महाराष्ट्र नायक’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी राज्यपाल राधाकृष्णन यांनी मराठी–हिंदी वादावर भूमिका मांडली. महाराष्ट्रात मराठी बोलले नाही तर मार खावा लागेल, हे सद्यस्थितीत मी वर्तमानपत्रात वाचत आहे. अशाच प्रकारचा वाद तामिळनाडूतही झाला होता तेव्हा मी खासदार होतो. रस्त्याने जाताना जमाव बघून रात्री ९ वाजता मी चालकाला गाडी थांबवायला सांगितले. मला बघून जमाव पांगला. मात्र ज्यांना जमावाकडून मारहाण झाली, ते तिथेच होते. झाल्या प्रकाराची माहिती घेतली असता, ती माणसे हिंदीत बोलू लागली. मला हिंदी येत नसल्याने ते काय बोलत आहेत, हे कळत नव्हते. एका माणसाने तमिळ येत नसल्याने त्यांना मारल्याचे सांगितले. त्यांच्याकडे तमिळ बोलण्याचा आग्रह केला जात होता, ते येत नाही म्हणून बाकीचे लोक त्यांना मारत होते. त्यानुसार आता मला मराठी येत नाही म्हणून कुणी मारहाण केली तर मला लगेच घडाघडा मराठी बोलता येईल का? असा प्रश्न राज्यपालांनी उपस्थित केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राज्यपाल हे संवैधानिक आहेत. राज्यपालांना कोणत्याही राजकीय वादात ओढणे चुकीचे आहे. राज्यपाल बोलतात ते योग्यच बोलतात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच पंढरपूर विकास आराखडा तयार केला जाणार आहे. कोणतीही गोष्ट लपून-छपून केली जाणार नाही. यासंदर्भात जे बाधित होणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, माझ्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या त्याला तेवढ्याच अर्थाने पाहिले पाहिजे. आम्ही एकमेकांचे राजकीय विरोधक आहोत, वैरी नाही. माझ्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्या शुभेच्छा होत्या, त्याचा चुकीचा अर्थ काढू नये. अन्यथा आपण कुठल्यातरी चुकीच्या संस्कृतीला पुढे नेत आहोत, असे होईल, असेही त्यांनी नमूद केले.