“स्वतःच्या अस्तित्वासाठी राहुल गांधी यांची लढाई”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 13:23 IST2026-04-12T13:21:40+5:302026-04-12T13:23:35+5:30
CM Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका केली.

“स्वतःच्या अस्तित्वासाठी राहुल गांधी यांची लढाई”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका
CM Devendra Fadnavis News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानतो की, त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि राज्याच्या ज्या वीज निर्मिती कंपनी आहे, त्यांना त्यांच्या मालकीची खाण देण्याचा निर्णय झाला. त्यातून आपल्या महाजेनकोला छत्तीसगड राज्यातील गरे पाल्मा ही खाण प्राप्त झाली आपण त्याचा एमडीओ केला. सगळे अडथळे पार करून बॉक्स कटिंग झाले आणि पहिला खेप या ठिकाणी आलेली आहे. यात सगळ्यात महत्त्वाचे आहे की, आता आपले कोळसा करिताच अवलंबित्व कमी होणार आहे. दुसरे या दुसर्याचा कोळशाचा ग्रेड अतिशय चांगला आहे. वीज निर्मिती कंपनीला क्वालिटी कोळसा मिळतो आहे, आपली वीज निर्मितीची क्षमता वाढेल आणि त्यासोबत त्याची कॉस्ट आपली कमी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, चंद्रशेखर बावनकुळे हे ऊर्जामंत्री होते, मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळी आम्ही याची सुरुवात केली, याला सहा सात वर्ष लागली. कोळशाची कुठलीही कमतरता आपल्याला पडणार नाही. पुढच्या काळात या कोळशामुळे वीज दर कमी करण्यात अजून यश येईल. आज कोळसा मिळतो तो २८००,२९०० किंवा ३२०० जेसीव्हीचा कोळसा आहे, थेट ४३०० जेसीव्हीचा कोळसा मिळाला, तर याचा परिणाम खूप मोठा होणार आहे. त्यामुळे जेवढा कोळसा आपण पूर्वी वापरायचा त्यापेक्षा जेसीव्ही वाढल्यामुळे तुलनात्मक मोठ्या प्रमाणात कोळशाचा वापर कमी होणार आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
स्वतःच्या अस्तित्वासाठी राहुल गांधी यांची लढाई
राहुल गांधीची लढाई ही केवळ स्वतःच्या अस्तित्वाची लढाई आहे, त्यांची लढाई ही फक्त त्यांचा सातत्याने होत असलेल्या पराभवातून आपले नेतृत्वाला कसं वाचवायचे, यासाठी आहे. आज काँग्रेस पक्षात अंतर्गत मोठ्या प्रमाणात हे आम्हाला जिंकून आणू शकत नाही, यांना हटवलं जावे, असा माहोल आहे. त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी ते असे बोलत असतात, अशी खोचक टीका फडणवीसांनी केली.
दरम्यान, आता तीन महत्त्वाचे कोल गॅसिफिकेशन प्रोजेक्ट हे महाराष्ट्रात सुरू झाले आहेत. देशात सात सुरू आहेत. हे प्रोजेक्ट यशस्वी झाल्यावर त्यातून आपल्याला काही गोष्टी मिळतील, त्या आधारावर इतर ठिकाणी जिथे आपल्याला कोळशाचे साठे वापरता आले नाही, तिथे याच पद्धतीने करता येईल का याची माहिती आपल्याला मिळेल. लोड शेडिंग कुठेही नाही. आपण आता ७० टक्के शेतकऱ्यांना दिवसा पावर देणे सुरू केले आहे, असेही ते म्हणाले.