'राज्यात पूरस्थिती असताना मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 04:33 AM2019-08-05T04:33:53+5:302019-08-05T06:33:46+5:30

काँग्रेस नेते नाना पटोले यांचा आरोप

CM busy in campaigning in state | 'राज्यात पूरस्थिती असताना मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त'

'राज्यात पूरस्थिती असताना मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त'

Next

मुंबई : अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते व रहिवासी भागांत पाणी साचल्याने भीतीचे वातावरण आहे. अशा बिकट प्रसंगी राज्य आपत्ती निवारण प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असलेले मुख्यमंत्री प्रचारयात्रेत व्यस्त आहेत.
मुख्यमंत्र्यांनी तातडीने उपाययोजना करून जनतेला संकटातून न काढल्यास आम्ही मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षाचा ताबा घेऊ, असा इशारा प्रदेश काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे प्रदेश काँग्रेस, मुंबई काँग्रेस व काँग्रेस प्रचार समितीच्या नेत्यांची तातडीची बैठक घेतली. या वेळी बोलताना पटोले म्हणाले, मुख्यमंत्री राज्यभर प्रचार दौरे करत असल्याने संपूर्ण यंत्रणा मुख्यमंत्र्यांची बडदास्त ठेवण्यामध्ये व्यस्त आहे. राज्याच्या मुख्य सचिवांपासून विभाग व जिल्हा स्तरावरील अधिकारी कोणतीही पावले उचलताना दिसत नाहीत, अशी टीकाही त्यांनी त्यांना केली.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आपत्तीग्रस्तांना आवश्यक मदत व साहाय्य करावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. या बैठकीस माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, मुंबई कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, कृपाशंकर सिंह, आमदार हरिभाऊ राठोड, मोहन जोशी, चरणजित सप्रा आदी नेते उपस्थित होते.

‘एसडीआरएफ फंडातून मदत द्यावी’
मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, पनवेल, बदलापूर, नवी मुंबई, रायगड, पेण, नाशिक, सांगली, कोल्हापूर यांसह राज्याच्या विविध भागांत महापुराने प्रचंड थैमान घातले आहे. कित्येकांना जीव गमवावा लागत आहे. लोक जीव मुठीत घेऊन वावरत आहेत. जनावरांच्या जीवितहानीची तर गणतीच नाही. घरात पाणी घुसल्याने नागरिकांना इतरत्र आश्रय घ्यावा लागत आहे. अनेक भागांतील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने नैसर्गिक आपत्ती जाहीर करून पूरग्रस्तांना ‘राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन कायदा- २००५’नुसार एसडीआरएफ फंडातून मदत वितरित करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Web Title: CM busy in campaigning in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.