ठाण्यात 'ते' नांगी टाकतात का?
शिंदेसेनेचे आ. राजेश मोरे यांनी 'आम्ही विकासकामे करतो, पण काही जण गलिच्छ राजकारण करतात', अशी टीका भाजपवर केली. त्यावर भाजपमधून मोरे हातचे राखून बोलतात, अशी टीका झाली. मोरे हे कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे आमदार असताना ते डोंबिवलीमध्ये का असतात, त्यांनी सगळी पदे स्वतःकडे ठेवून घेतली तर कार्यकर्त्यांनी काय पिशव्या उचलायच्या का असा टोला भाजपत आलेल्या माजी नगरसेवकांनी लगावला आहे. डोंबिवलीत शिंदेसेनेच्या आमदारांवर भाजप टीका करते तर ठाण्यात भाजपचा नेता शिंदेसेनेच्या शाखाप्रमुखाच्या कानाखाली मारतो. ठाण्यात शिवसेना दिवंगत आनंद दिघे यांच्या मुशीत तयार झालेली असताना भाजपसमोर नांगी टाकते का अशी चर्चा सुरू आहे.
ओमी टीमचा हात 'त्यांनी' का धरला
उल्हासनगरमध्ये सातत्याने विजयी होणाऱ्या जमनुदास पुरस्वानी यांच्यासह चार निष्ठावंतांनी 'ओमी कलानी टीम'मध्ये प्रवेश केला. त्यानंतर पप्पू कलानी व ओमी कलानी यांनी निवड समिती जाहीर केली. यामध्ये पूर्वाश्रमीच्या या भाजप निष्ठावंतांना स्थान दिले. पुरस्वानी हे निष्ठावंत असल्याने भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकाळात ते त्या पक्षात सक्रिय होते. मुंडे यांनी नव्वदच्या दशकात उल्हासनगरात राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध एल्गार पुकारला होता. कदाचित पुरस्वानी व अन्य निष्ठावंत त्यावेळी कलानी यांच्यासमोर संघर्षाकरिता उभे राहिले असतील. आता भाजपमधील कथित उपऱ्यांच्या त्रासामुळे त्यांना कलानी यांचा हात धरला आहे असे कार्यकर्त्यांना वाटत असावे; पण, सत्य गुलदस्त्यातच राहणार हे नक्की!
राग महायुतीतील अन् श्रेयवादाचा सूर
ठाण्यात शिंदेसेना-भाजपमधील वाद कमी होताना दिसत नाही. शिंदेसेनेच्या विकासकामांचा भंडाफोड भाजपने केल्यानंतर श्रेयवादाच्या लढाईत भाजप उतरली आहे. बीएसयूपीच्या घरांच्या शुल्क सवलतीचे श्रेय भाजपचे असल्याचे आ. संजय केळकर यांनी ठणकावून सांगितले. केळकर यांनी हा षटकार ठोकल्यावर एन.टी. केळकर क्रिकेट सामन्यांच्या निमित्ताने चौकार, षटकार खेचत असताना शिंदेसेनेचे खा. नरेश म्हस्के यांनी बीएसयूपीच्या घरांसाठी लागणारा मुद्रांक शुल्क आमच्यामुळेच शंभर रुपये झाला, असा चौकार मारला. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर शिंदे यांनी महायुतीचा राग आळवला, पण भाजपने वरच्या पट्टीचा सूर ठेवला आहे.
मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
मनसेच्या माध्यमातून राज ठाकरे यांना पहिली सत्ता नाशिक महापालिकेत मिळाली होती. या शहरासह ग्रामीण भागात उत्साही कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. प्रत्येक नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद निवडणुकीत ते उमेदवार म्हणून सज्ज असतात. यंदाही राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या. स्थानिक पातळीवर इच्छुकांच्या मुलाखतीही झाल्या. पण अचानक राजाज्ञा आली. नगरपरिषदांची निवडणूक लढवायची नाही. पुन्हा इच्छुकांचा भ्रमनिरास झाला. आता निवडणूक न लढविण्यामागे वेगवेगळी कारणे चर्चेत आहेत. पराभव नकोही असेल, पण म्हणून काय निवडणूक लढवायची नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Web Summary : Internal strife plagues Thane's Shiv Sena and BJP, with accusations of political maneuvering and credit grabbing. Ulhasnagar sees shifts to the Omi Kalani team, while MNS aspirants face disappointment as local elections are skipped.
Web Summary : ठाणे में शिवसेना और भाजपा में आंतरिक कलह, राजनीतिक पैंतरेबाजी और श्रेय लेने के आरोप। उल्हासनगर में ओमी कलानी टीम में बदलाव, जबकि मनसे के उम्मीदवारों को निराशा क्योंकि स्थानीय चुनाव छोड़े गए।