मुंबई/ठाणे: महापालिका निवडणुकीकरिता प्रारूप मतदारयाद्या गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आल्या. यानुसार मुंबईत २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत यंदा ११ लाख ८० हजार १९१ मतदारांची वाढ झाली आहे. तर, ठाण्यात ४ लाख २१ हजार २६१ मतदार वाढले. कल्याण -डोंबिवली महापालिकेसह महामुंबईतील अन्य महापालिकांमध्येही ही संख्या वाढली असल्याने ती कोणाच्या पथ्यावर पडणार हे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. या वाढीत महिला मतदारांची संख्या अधिक आहे.
मुंबईत २०१७मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत यंदा ११ लाख ८० हजार १९१ मतदारांची वाढ झाली आहे. जुलै २०२५ची मतदारयादी २०२५च्या विधानसभा निवडणुकीच्या यादीला गृहीत धरून करण्यात आली आहे. ठाण्यात ४ लाख २१ हजार २६१ मतदार वाढले आहेत. त्यामध्ये महिलांची संख्या अधिक आहे. कल्याण डोंबिवलीही मतदारांच्या संख्येत एक लाख ७३ हजार ६७४ एवढी मतदारांची संख्या वाढली.
उल्हासनगर महापालिका हद्दीत मतदारांची संख्या जेमतेम ३३ हजार ९९८ वाढली. या शहरांमधील मतदार याद्यांवरून यापूर्वी उद्धवसेना, मनसे यांनी आरोप केले होते. मात्र, याद्यांमधील दुबार मतदारांची नावे वगळल्याचा दावा प्रशासनाने केला. ठाणे महापालिकेच्या २०१७मध्ये झालेल्या निवडणुकीत पुरुष मतदारांची संख्या ६ लाख ६७ हजार ५०४ एवढी होती. आता ही संख्या ८ लाख ६३ हजार ८७८ झाली आहे.
कल्याण - डोंबिवलीत २०१५ मधील निवडणुकीत १२ लाख ५० हजार ६४६ मतदार होते. यावेळी मतदारांची संख्या १४ लाख २४ हजार ३२० झाली. मतदारांच्या संख्येत १ लाख ७३ हजार ६७४ने वाढ झाली. भिवंडी क्षेत्रात आठ वर्षानंतर १ लाख ८९ हजार ७८० मतदारांची वाढ झाली. उल्हासनगर हद्दीत मतदारांची संख्या केवळ ३३ हजार ९९८ने वाढली.
भिवंडीत २ लाखांनी फरक
भिवंडीत ६,६९,३३ मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये ३ लाख ८० हजार ६२३ पुरुष, २ लाख ८८ हजार ९७स्त्री, तर ३११ इतर मतदारांची नोंद झाली. आता १ लाख ८९ हजार ७८० मतदारांची वाढ झाली आहे.
नवी मुंबई, पनवेलमध्ये हरकत, सूचना नाही
नवी मुंबई व पनवेलमध्ये याद्या जाहीर केल्या आहेत. यात पहिल्या दिवशी एकही हरकत वा सूचना आली नाही. तर, मीरा भाईंदरची प्रभाग रचना २०११ सालच्या जनगणनेनुसार ८ लाख ९ हजार असली तरी प्रारूप यादीत ८ लाख १९ हजार १५३ मतदारांची संख्या आहे. २०१७ सालच्या पालिका निवडणुकीवेळी ५ लाख ९३ हजार ३३६ मतदार संख्या विचारात घेता संख्या २ लाख २५ हजार ८१७ ने वाढली. वसई-विरारमध्ये ५ लाख ८७ हजार ९९९ पुरुष, तर ५ लाख १६ हजार १ महिला व इतर १११ असे मिळून ११ लाख ४ हजार १३५ मतदार आहेत.